Skip to content Skip to footer

मुंबई-पुण्यातल्या पावसाची चर्चा लोकसभेत, खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली मदतीची मागणी.

मुसळधार पावसामुळे इमारत किंवा भिंत कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या, ‘नॅशनल बिल्डिंग कोड’ची (राष्ट्रीय भवन निर्माण संहिता) अंमलबजावणी करण्याची सक्ती राज्य सरकार आणि महानगरपालिकेला करावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी लोकसभेत केली. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी केंद्र सरकार ने मुंबईला मदत करावी, अशी मागणीही शेवाळे यांनी केली.

मुंबईसह संपूर्ण राज्यभरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाची माहिती देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी शून्य प्रहरात प्रश्न उपस्थित केला. खासदार शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले, “वास्तविक, संपूर्ण जुलै महिन्यात पडणारा पाऊस केवळ दोन दिवसांत पडला आहे. यामुळे मुबंईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुंबई-पुण्यात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून काही लोकांचा मृत्यू झाला. अशा गंभीर दुर्घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘नॅशनल बिल्डिंग कोड’ ची अंमलबजावणी राज्य सरकार आणि पालिकेला सक्तीची करावी. या कोडचा वापर ऐच्छिक असल्या कारणाने त्याचा वापर केला जात नाही”तसेच, मुसळधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या गंभीर स्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे आणि इतर माध्यमातून मुंबईला मदत करावी, अशी मागणीही खासदार राहुल शेवाळे यांनी केली.

Leave a comment

0.0/5