मोदी २.० सरकारच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.५) संसदेत सादर करणार आहेत. माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या त्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री आहेत, ज्यांनी संरक्षण व अर्थ मंत्रालय सांभाळलेले आहे. विशेष म्हणजे तब्बल ४९ वर्षानंतर देशातील दुसरी महिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. याआधी ४९ वर्षापूर्वी पहिल्यांदा २८ फेब्रुवारी १९७० मध्ये माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता.
इंदिरा गांधी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते की, मला माफ करा कारण सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशाला भार सोसावा लागणार आहे. त्यांनी सिगारेट ड्युटी ३ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत वाढविली. यामुळे सरकारला अतिरिक्त १३.५० कोटी महसूल मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांनी अर्थसंकल्पात आयकर सवलत मर्यादा वाढवून ४० हजार रुपये केली. यामुळे देशाला मिळणारा महसूल ३,५८७ कोटीवरून ३,८६७ कोटीपर्यंत वाढेल, असे त्यांनी सांगितले होते.
इंदिरा गांधी यांनी त्यावेळी भविष्य निर्वाह निधीबाबत (ईपीएफ) मोठी घोषणा केली होती. ईपीएफमध्ये कर्मचाऱ्याचे ८ टक्के आणि संस्थेच्या भागीदारी शिवाय सरकार आपला वाटा देईल. तसेच कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शन म्हणून ही रक्कम संबंधित कुटुंबियाला दिली जाईल, अशी त्यांनी घोषणा केली होती. त्यांनी शहर विकास महामंडळाची स्थापन करण्याची घोषणा देखील केली होती