Skip to content Skip to footer

राहूल गांधींनी मैदान सोडल्यामुळे आमदार सुद्धा पळ काढत आहे.

काँग्रेस ही बुडणारी नौका आहे. या नौकेचे कॅप्टन राहुल गांधी यांनी मैदान सोडल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता आमदारही पळ काढणारच, असा टोला भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी मारला. भाजपाकडून सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये केले होते. याप्रसंगी चौहान कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.

देशाला कमजोर करण्याचे काम तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी केल्याचा आरोप चौहान यांनी केला. काँग्रेसच्या बुडणार्‍या नौकेचे कॅप्टन राहुल गांधी यांनी मैदान सोडले आहे. त्यामुळे कर्नाटकच्या आमदारांनी पक्षातून पळ काढला, याचे आपल्याला फारसे आश्‍चर्य वाटलेले नाही.

राहुल गांधी यांचा पर्याय शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या काँग्रेस करीत आहे. मोतीलाल वोरा यांच्यासारखे शंभर वर्षे वय झालेले व अशोक गेहलोत सारखे नेते जे आपल्या मुलाला लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकले नाहीत, अशा नेत्यांच्या नावाची चर्चा काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुरू आहे. साहजिकच काँग्रे्रस नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केला तर त्यात फारसे आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.

राष्ट्र उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अथक मेहनत घेत आहेत, असे सांगत चौहान म्हणाले की, पं. नेहरू यांच्यामुळे दोन तृतीयांश काश्मीर आजही पाकिस्तानच्या ताब्यात आहे. इंदिरा गांधी यांनी तर लोकशाहीलाच पायदळी तुडवले होते तर राजीव गांधी यांनी शहाबानो प्रकरणानंतर तुष्टीकरणाचे राजकारण केल्यामुळे असंख्य मुस्लिम महिलांचा अधिकार हिरावला गेला. स्वतः केलेल्या पापाची फळे आज काँग्रेस पक्ष भोगत आहे.

Leave a comment

0.0/5