Skip to content Skip to footer

अध्यक्ष निवडता येत नसेल तर कार्यलयांना टाळे ठोका – उद्धव ठाकरे

अध्यक्ष पदावरून काँग्रेस पक्षात घमासान चालू झालेले आहे. अध्यक्ष पदाचा काही दिवसापूर्वी राहुल गांधीनी राजीनामा दिलेला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण देशात काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा देणे सुरू केले होते. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि अशोक गेहलोक यांच्या नावाची अध्यक्ष पदासाठी काँग्रेस मध्ये चर्चा चालू होती परंतु काँग्रेसच्या यंग ब्रिगेडने या दोन्ही नावाला विरोध दर्शविला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षात अजूनही अध्यक्ष पद रिक्तच आहे. या काँग्रेस अध्यक्ष पदावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलेले आहे.

काँग्रेस रसातळाला जायला गांधी परिवार जबाबदार नाही तर त्याला काँग्रेसचे जुने नेतेच कारणीभूत आहेत, असे त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हटले आहे. या काँग्रेस नेत्यांना जर आपला अध्यक्ष निवडता येत नसेल तर त्यांनी आपल्या कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरातच बसावे असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेस ही संघटनाच आता कोसळून गेली आहे. देशासमोर मोठे प्रश्न असताना जनता आशेने विरोधी पक्षांकडे बघत असते. मात्र, काँग्रेसचे नेते राहुल गांधींचीच मनधरणी करण्यात व्यस्त आहेत.

विरोधी पक्षाची आपली जबाबदारी सक्षमपणे सांभाळण्याबाबतही कोणाला काही वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसची आजची स्थिती म्हणजे त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे मिळालेले फळ आहे. काँग्रेसचे नेतेच सध्या गांधी परिवाराचा छळ करीत आहेत. घराणेशाहीच्या सावलीतून बाहेर पडावे असे राहुल गांधींनी ठरवले मात्र, त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांना घराणेशाहीच्या सावलीत बसायचे आहे त्यांना उन्हात काम करायचे नाही.

अशा शब्दांत टोला लगावताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यावरही टीकास्त्र सोडले. पराभवाची जबाबदारी स्विकारुन राजीनामा दिल्याचे म्हणावे तर मग इतका वेळ का लावला? असा बोचरा सवाल त्यांनी देवरा यांना केला आहे.

Leave a comment

0.0/5