Skip to content Skip to footer

पीकविमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा……

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर द्यावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पीकविमा कंपन्यांच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता येरवडा पोस्ट कार्यालयाजवळील बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीवर हा मोर्चा जाणार आहे, अशी माहिती शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, संपर्कप्रमुख सुनील (बाळा) कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सत्यवान उभे, पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहर समन्वयक आनंद दवे आदी उपस्थित होते.

रघुनाथ कुचिक म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे त्यांना मिळावेत, यासाठी मुंबईसह राज्यभरात पीक विमा कंपन्यांच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात येणार आहेत. मुंबईत भारती एक्सा कंपनीवर, तर पुण्यात बजाज अलियांज कंपनीवर हा मोर्चा निघणार आहे. लाखो शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे कंपन्यांनी दडपले आहेत.

सुनील कदम म्हणाले, पुण्यात शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, शिवाजीराव आढळराव पाटील, रघुनाथ कुचिक यांच्या नेतृत्वाखाली हा प्रतीकात्मक मोर्चा निघणार असून, जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक व शेतकरी यामध्ये सहभागी होणार आहेत. या मोर्चानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ पीक विमा कार्यालयात जाऊन जाब विचारणार आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले, नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल.

Leave a comment

0.0/5