Skip to content Skip to footer

नागपुरातील पाणी पॅकेजिंग कंपनीवर बीआयएसची धाड

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील श्री बालाजी फूड अ‍ॅण्ड ब्रेव्हरेजेस कंपनीमध्ये २० लिटर पाण्याच्या कॅनवर अवैधरीत्या आयएसआय मार्क चिन्हांकित करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. माहितीच्या आधारे भारतीय मानक ब्युरोच्या नागपूर शाखेचे प्रमुख आर.पी. मिश्रा यांच्या नेतृत्वात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कंपनीवर धाड टाकली.

कारवाईत कंपनीच्या गोदामातून बॅली बॅ्रडची ३५ आणि ब्ल्यू किंग ब्रॅण्डचे २० लिटरचे १३८ कॅन तसेच १७३ बॉटल जप्त केल्या. या सर्व पॅकिंगवर कंपनीच्या संचालकांनी भारतीय मानक ब्युरोकडून परवाना न घेता अवैधरीत्या आयएसआय मार्कचा उपयोग करण्यात येत होता.

बॅली ब्रॅण्डच्या ३५ कॅनवर पॅकेजिंग कंपनी श्री बालाजी फूड अ‍ॅण्ड ब्रेव्हरेजेस कंपनी (शंकरपूर) अशी नोंद करण्यात आली होती. तर ब्लू किंग ब्रॅण्डच्या १३८ कॅनवर सनशाईन ब्रेव्हरेजेस (नरेंद्रनगर) आणि येरने अ‍ॅग्रो इंड्रस्टीज (जसपूर-नागपूर) यांच्यातर्फे पॅकेजिंग करण्यात आल्याची नोंद केली होती.
या प्रकारे विनापरवाना अवैधरित्या पॅकेज पाण्याचे कॅन वा बॉटलवर आयएसआय मार्क लावून विक्री करणे गैरकायदेशीर आहे.

समारंभात मिळणारे पाणी अशुद्धच!
ब्युरोच्या सूत्रानुसार लग्नसमारंभ वा अन्य कार्यक्रमात कॅनमध्ये लोकांना देण्यात येणारे पाणी नियमानुसार आयएसआय मार्कचे नसते. ते पाणी अशुद्धच आहे. कॅनमधील पाणी केवळ एक दिवसासाठी पिण्यायोग्य असते. पण लोक या पाण्याला शुद्ध पाणी समजतात. हे चुकीचे आहे.
पॅकिंगवर आयएसआय मार्क आवश्यक
भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनुसार कोणत्याही पारदर्शक पाण्याच्या बॉटलवर आयएसआय मार्क असणे आवश्यक आहे. ब्युरोकडून परवाना प्राप्त करणारी कंपनीच पॅकिंग पाण्याच्या बॉटलवर उपरोक्त ट्रेडमार्कचा उपयोग करू शकते. मान्यताप्राप्त कंपनीच्या बॉटलचे पाणी ३० दिवसांपर्यंत पिण्यायोग असते. अशा स्थितीत काही कंपन्या अवैधरीत्या पॅकिंग पाण्याच्या बॉटलवर आयएसआय मार्कचा उपयोग करून ग्राहक आणि ब्युरोची फसवणूक करीत आहे.

Leave a comment

0.0/5