Skip to content Skip to footer

सोलापुरात राष्ट्रवादीच्या मुलाखतीला इच्छुकांनी फिरवली पाठ

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरिता पक्षाचे नेते अजित पवार हे शुक्रवारी सोलापुरात आले असता या मुलाखतींना जिल्ह्य़ातील माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे दोघे गैरहजर राहिले.

एकीकडे दोन्ही काँग्रेसमधील काही आजी-माजी आमदारांसह साखर कारखानदार भाजप-सेना युतीच्या मार्गावर असल्याच्या हालचाली होत असताना दुसरीकडे पक्षाने घेतलेल्या मुलाखतींकडे दोन वजनदार आमदारांकडून पाठ फिरविण्याचा प्रकार ‘झाल्यामुळे राष्ट्र्वादीत गोंधळाचे वातावरण आहे.
सोपल, शिंदे यांच्या गैरहजरीबद्दल स्पष्टीकरण देताना अजित पवार यांच्यावर आज सारवासारव करण्याची वेळ आली. सोपल आणि शिंदे यांचे अनुक्रमे बार्शी, माढय़ातून एकटय़ाचेच अर्ज पक्षाकडे आले होते. परंतु प्रत्यक्ष मुलाखत देण्यासाठी आमदार सोपल हे येऊ शकले नाहीत.

दिलीप सोपल हे तीन दिवस देवदर्शनासाठी श्रीशैल येथे गेले आहेत. तर माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांचाही तेथून एकमेव इच्छुक उमेदवारी अर्ज प्राप्त झाला आहे. परंतु मुलाखतीसाठी शिंदे हे का येऊ शकले नाहीत, याची माहिती नाही. त्याबद्दल त्यांना विचारले जाईल, असे सांगत त्यांनी या प्रकरणावर बोलण्याचे टाळले.

Leave a comment

0.0/5