Skip to content Skip to footer

जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश,पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळणार

मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच बीड येथे आल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी बीडचा दुष्काळ भूतकाळ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याची गरज असल्याचे सांगितले होते. तसेच त्यासाठी राज्यसरकारकडे पाठपुरावा करून आग्रह धरू, अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यासाठीच्या सर्व्हेक्षणाला देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

मराठवाड्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो तसेच पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्याला पाणी द्यायचे म्हटले की त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होतो. त्याचवेळी वैतरणा, टेम्भुर्णी अशा पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मोठ्याप्रमाणावर समुद्रात वाहून जाते.

त्यामुळे पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी आडवून, ते काही ठिकाणी लिफ्ट करून धरण आणि कालव्याच्या मदतीने मराठवाड्यातील धरणांमध्ये सोडण्याचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मागील महिन्यात हा प्रकल्पच मराठवाड्याच्या दुष्काळावरील उपाय असून हा प्रकल्प व्हावा यासाठी आपण आग्रही आहोत, स्वतः मुख्यमंत्र्यांशी याबाबत पाठपुरावा करणार आहोत, असे म्हटले होते.

Leave a comment

0.0/5