Skip to content Skip to footer

बाहेरून हमाल आणून मार्केट सुरू ठेवणार : दि पूना मर्चंट्स चेंबरची भूमिका

हमालांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून हमाल आणून मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजाराचे काम सुरू ठेवण्याची भूमिका दि पूना मर्चंट्स चेंबरने घेतली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजार बंद राहणार नाही. मात्र, यामुळे चेंबर आणि महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मार्केट यार्डात तोलणारांना गूळ-भुसार बाजारात कामावर रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून  हमाल पंचायतीने बेमुदत संपपुकारला. त्यामुळे मार्केट यार्डातील व्यवहारांवर परिणाम झाला असून बाजारात माल घेऊन आलेल्या सुमारे १५० ते २०० गाड्या उभ्या आहेत. या पार्श्वभूमीवर दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन चेंबरची भूमिका स्पष्ट केली. या वेळी चेंबरचे उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव विजय मुथा, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ओस्तवाल म्हणाले, की इलेक्ट्रॉनिक काटे व पॅकिंग स्वरूपात माल येत असलेल्या ठिकाणी तोलणारांची गरज नसल्याचे पणन संचालंकांनी २०१४मध्ये काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. तसेच, न्यायालयीन लढाईनंतर या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याने हमाल पंचायतीने पुकारलेला संप बेकायदा आहे.तसेच केवळ ३३ तोलणारांकरिता हमाल पंचायत ६०० व्यापारी आणि ३ हजार हमालांना वेठीस धरत आहे. सध्या पावसाचे दिवस असून काही नुकसान झाल्यास त्याला हमाल पंचायतच जबाबदार असेल.

संपामुळे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. माल भरून आलेल्या गाड्याही मार्केट यार्डात उभ्या आहेत. चेंबर आणि हमाल पंचायतीच्या करारानुसार संप पुकारण्यापूर्वी ४८ तास आधी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. मात्र, हमाल पंचायतीने या कराराचे पालन केलेले नाही. हमाल पंचायतीमुळे व्यापार व शहरातील अन्नधान्य पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असेही ओस्तवाल म्हणाले.
मार्केट मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात हमालांनी बंद पुकारला, तरी बाजार सुरूच ठेवला जाणार आहे. खरेदीदारांनी मार्केटमध्ये खरेदीस यावे, व्यापारी माल भरून देण्यास तयार आहेत, असे चेंबरने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे गरज भासल्यास पोलीस संरक्षण दिले जाईल, असे बाजार समिती प्रशासनाने सांगितले असल्याचे चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.
दि पूना मर्चंट्स चेंबरसह बाजार समितीलासुद्धा हमालांच्या आंदोलनाबाबत कळविण्यात आले होते. चेंबरने कोणत्याही आदेशाविना तोलणारांना परस्पर कामावर न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. चेंबर बाहेरून हमाल आणून काम करून घेणार असेल, तर सध्या सुरू असलेले आंदोलन राज्यव्यापी होईल. बाहेरचे हमाल आणण्याचा प्रकार हा संघटना फोडण्याचा डाव आहे. त्यामुळे आम्ही बाहेरच्या हमालांना विरोध करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते   डॉ. बाबा आढाव यांनी दिला.- बाबा आढाव, हमाल पंचायत

Leave a comment

0.0/5