Skip to content Skip to footer

ईव्हीएमवर संशय घेण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे – मुख्यमंत्री

जनतेचा पाच वर्ष पाठींबा हीच खरी पावती असून आम्ही जनतेप्रती उत्तरदायी असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आज वर्धात पोहोचली, याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधकांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला दोष देण्याएवजी आत्मचिंतन करावे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी, पाच वर्षात आम्ही जी कामे केली त्याने सर्व प्रश्न सुटले असा आमचा दावा नाही. मात्र येत्या पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यावर आमचा विशेष भर राहणार असल्याचे म्हटले. भारतीय जनता पक्षात आता कुणालाही प्रवेश मिळणार नसून, आता जागा संपली आहे, शिवसेना आणि मित्रपक्षांसोबतचा जागावाटपाचा मुद्दा वाद न होता सुटेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

विरोधक हे सत्य स्वीकारण्याऐवजी असत्याची कास धरतात. या ईव्हीएमच्या माध्यमातून त्यांनी दहा वर्षे राज्य केले, आणि आता त्यालाच विरोध होत आहे. ईव्हीएमवर शंका घेणे म्हणजे जनतेवर शंका घेणे आहे. विरोधकांनी जनतेत जाऊन काम केले नसल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

Leave a comment

0.0/5