खालच्या पातळीवर टीका केल्याने संदीप क्षीरसागरांवर पवार नाराज?

संदीप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्यात आली असताना संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी नेतृत्व नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधकांवर टीका करताना पातळी सोडल्याने खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातही एकेकाळी राष्ट्रवादीचं दिग्गज नेते राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर कमरेखालच्या भाषेत टीका करून संदीप क्षीरसागर यांनी चूक केली असल्याचं राष्ट्रवादी नेत्यांचं म्हणणं आहे. जयदत्त क्षीरसागर हे सध्या शिवसेनेत असून राज्य मंत्रिमंडळात रोहयो मंत्री आहेत. संदीप क्षीरसागर हे त्यांचे पुतणे आहेत. या काका पुतण्यातील वाद सर्वश्रुत आहे. परंतु जयदत्त क्षीरसागर हे ७५ वर्षांचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर टीका करताना संदीप यांनी नातं, वय, अनुभव यापैकी कशाचेच तारतम्य न बाळगता टीका केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीविषयी नाराजीचे वातावरण आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतून सध्या अनेक नेते आणि आमदार शिवसेना-भाजपमध्ये जात आहेत. त्यापैकी कोणत्याही नेत्यावर राष्ट्रवादीकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात आलेली नाही. संदीप क्षीरसागर यांनी मात्र जयदत्त क्षीरसागर यांच्यावर सडकून टीका केली. त्यातही थेट तुमचे कपडे फाडू असं वक्तव्य केलं. घोटाळ्यांचे खोटे आरोप केले. तसेच ५० कोटी रुपयांना मंत्रिपद विकत घेतल्याचे बिनबुडाचे आरोप केले. जर जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद हवं असत तर त्यांनी युतीची सत्ता येताच ते मिळवलं असतं. फक्त ४ महिन्यांसाठी मंत्रिपद मिळवणं हे त्यांचं ध्येय नाही. त्यामुळे संदीप यांच्या टीकेला काहीच अर्थ नसल्याची चर्चा बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ज्या क्षीरसागर घराण्याने राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून निष्ठेने काम केलं त्याच क्षीरसागर घराण्यातील व्यक्तीवर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून गलिच्छ आरोप आणि कमरेखालचा भाषेत टीका झाली असल्याने राष्ट्रवादीला याचा जबर फटका बसू शकतो. यामुळेच क्षीरसागर यांच्या अतिउत्साही आणि अतिरंजित भाषणावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत असं समजतं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here