विरोधकांना उरून पुरणारे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक

राज्यात महायुतीचे सरकार बहुमतात येऊन सुद्धा भाजपाच्या आडकाठीमुळे महराष्ट्रात युतीचे सरकार येऊ शकले नाही. त्यातच भाजपाने लोकसभा निवडणुकीला शिवसेना पक्षाला दिलेले वचन न पाळता मुख्यमंत्री पदावरून आपलेच शब्द फिरविले. त्यामुळे भाजपाला दिलेल्या वचनाची आठवण करून देण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक खासदार संजय राऊत स्वतः मैदानात उतरले होते. भाजपाला दिलेल्या वचनाची आठवण करून देताना अक्षरशः भाजपा नेत्यांना राऊतांनी घाम फोडला होता. आज त्याच वाघाचा वाढदिवस असल्यामुळे संजय राऊत यांच्या बद्दल जाणून घेऊया…

शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे प्रवक्ते, शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक अशा अनेक भूमिका निभावणारे संजय राऊत नेहमीच भाजपाला अंगावर घेत आले आहेत. तसेच पक्षाच्या प्रत्येक भूमिकांसाठी ते ठाम राहिले आहेत. संजय राऊत हे आळीपाळीने विद्धान आणि पहेलवान या दोन्ही भूमिका नेटकेपणाने बजावतात. म्हणूनच मास बेस नसला, तरी राजकारणात राऊतांच्या प्रत्येक शब्दाला आज वजन आहे. दिल्लीत भाजपविरोधात मोर्चेबांधणीसाठी चंद्राबाबू नायडूंपासून ममता बॅनर्जींपर्यंतच्या भेटीगाठी असो, संजय राऊत प्रत्येक आघाडीवर पुढे राहिले आहेत.

संजय राऊत हे महाराष्ट्रात शिवसेनेचे आणि दिल्लीत पवारांचे स्नेही असतात, अश्या चर्चाही होतात. मात्र राऊतांच्या याच स्नेहामुळे भाजपाच्या सत्तेची चव अनेकदा तीखट केली आहे. म्हणूनच हिंदुत्वाआडून ठसठसीत पुढे येणारी ”मराठी अस्मिता” राऊतांच्या बोलण्यातून वारंवार जाणवते. कधी-काळी राऊत हे राज ठाकरेंच्याही जवळचे होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या मनधरणीसाठी राऊत आणि मनोहर जोशी राज ठाकरेंच्या घरी पोहचले. मनसेच्या स्थापनेनंतर मात्र राऊतांनी सामनातून शिवसेनेच्या भूमिकेला अजून धारदार केली आणि हळूहळू ते पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या विश्वासातले नेते बनले.

मूळ अलिबागचे असणारे राऊत आता वयाच्या साठीत आहेत. आजही एकत्रित कुटुंब पद्धती रमणाऱ्या राऊतांना पूर्वशी आणि विदीता या दोन मुली आहेत. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत या मुंबईतच शिक्षिका आहेत. कला शाखेचे पदवीधर असणाऱ्या राऊतांचे पत्रकारितेचे कुठलेही शिक्षण झाले नाही. मात्र सामना हे वृत्तपत्र आजही गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत ठेवण्यात राऊतांचे मोठे योगदान आहे. सिनेमाचेही कुठलंही तंत्र ते शिकले नाहीत. मात्र बाळकडू, ठाकरे यासांरखे सिनेमे बनवल्यानंतर जॉर्ज फर्नाडिंस आणि ठाकरे सिनेमाचा सिक्वलही ते बनवत आहे. राऊतांच्या भूमिकेबाबत, त्यांच्या विधानांबाबत विरोधकांमध्ये आणि शिवसेनेतही दुमत आहे. मात्र त्यांच्या निष्ठेवर शंका घेणारा एकही नाही. सामनातले प्रत्येक वाक्य आणि तोंडातला प्रत्येक शब्द ते शिवसेनेसाठी लिहितात आणि शिवसेनेची बाजू परखडपणे मांडतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here