“शिवसेनेकडून अपेक्षा नाही पण मनसे सरकारला भाग पाडणार”; राजू पाटील यांचा इशारा

; राजू पाटील यांचा इशारा- ; Warning by Raju Patil

जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये पक्षाने हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. त्यानंतर आता याच भूमिकेला साजेशी मागणी करत मनसेने शिवसेनेचा औरंगाबादच्या नामांतरणाचा मुद्दा हाती घेतला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी केली आहे.

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे अशी शिवसेनेची मागील दोन दशकांहून अधिक काळापासून मागणी आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेने अनेकदा औरंगाबादमधील राजकारण केलं आहे. मात्र आता हाच मुद्दा मनसेने आपल्या हाती घेतल्याचे चित्र दिसत आहे. मनसेच्या राजू पाटील यांनी याच मुद्द्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधत जिल्ह्याच्या नामांतरणाची मागणी केली आहे.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही असल्याचे राजू पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मंगळवारी औरंगाबादमध्ये झालेल्या मनसे नेत्यांच्या बैठकीमध्ये औरंगाबादच्या नामांतरणाच्या विषयावर चर्चा झाली. या बैठकीला राजू पाटील यांच्याबरोबर अभिजित पानसेही उपस्थित होते. या बैठकीनंतर स्थानिक नेत्यांशी बोलताना “संभाजी नगर असं नाव करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि राज्यशासनाला यासाठी भाग पाडू”, असा विश्वास या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

याच मागणीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पाटील यांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “मागील बऱ्याच काळापासून केंद्रात आणि राज्यातही शिवसेना सत्तेत होती. मात्र या नामांतरणावरुन केवळ राजकारण करण्यात आलं. कुठलाही आवाज उठवला नाही किंवा ठोस भूमिका घेतली नाही. जिल्ह्याचं नाव बदलायला केंद्राकडून मंजूरी लागते. मात्र तशी मागणी राज्य शासनाने केली पाहिजे. यावेळेस शिवसेनेकडून लोकांना काहीच अपेक्षा नाहीत. मात्र मनसे राज्य सरकारला जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर असं करण्यास भाग पाडणार आहे,” असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here