भाजपाच्या राज्यव्यापी अधिवेशनात पुन्हा खडसेंना दुय्यम स्थान
भाजपच्या राज्यव्यापी दोन दिवसीय अधिवेशन नवी मुंबई येथे भरले होते. या अधिवेशनाला राज्यभरातील भाजपाच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती. परंतु या अधिवेशनाला पुन्हा एकदा राज्यातील नेत्यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले होते. या अधिवेशनात पहिल्या रांगेत खुर्ची नाकारून दुसऱ्या रांगेतील खुर्ची देण्यात आल्याचे पाहून खडसे चांगलेच संतापले.
विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये दाखल झालेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि माजी मंत्री गणेश नाईक मात्र पहिल्या रांगेत बसलेले होते. हे पाहून खडसेंनी अधिवेशनावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली, तेव्हा कुठे त्यांना पहिल्या रांगेतील खुर्ची देण्यात आली.
नवी मुंबईतील नेरूळ येथील भाजपच्या दोन दिवशीय राज्यव्यापी अधिवेशनात रविवारी खुले अधिवेशन घेण्यात आले. चंद्रकांत पाटलांनी दुसऱ्यांदा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या सूत्रे स्वीकारली. २०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डावलून देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातल्यापासूनच खडसे पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत.
२०१६ मध्ये खडसेंना भोसरी येथील जमीन घोटाळाप्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खडसेंना पक्षाने उमेदवारीही नाकारली आणि त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. रोहिणी खडसेंच्या पराभवाला भाजपतील नेतेच जबाबदार असल्याचा आरोपही खडसे यांनी केला होता. तेव्हापासून खडसे भाजप नेत्यांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.