काम करताना किंचाळण्याची गरज नसते; उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना रोहित पवारांचा विरोधकांना चिमटा

काम-करताना-किंचाळण्याची-Screaming while at work

राज्यात करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर भाजपातील नेत्यांकडून सातत्यानं टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत नसल्याच्या विरोधकांच्या आरोपाचा आमदार रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना रोहित पवार यांनी भाजपाला चिमटा काढला

राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं निर्णय घेत काम करण्यास सुरूवात केली. वेळोवेळी घेण्यात आलेले निर्णय आणि राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे उद्धव ठाकरे यांचं सर्व स्तरातून कौतुक होत असताना भाजपातील काही नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

विरोधी पक्षातून उद्धव ठाकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात, पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते. शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येत असेल आणि त्यांना महाविकास आघाडीचे नेतेही खंबीर साथ देत असतील, तर उगाच घसा फोडण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटलेला कधीही चांगला,” अशा शब्दात रोहित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

नागरिकांना केलं आवाहन –

“करोना लढ्यात मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी डॉक्टर, पोलीस, नर्स, स्वच्छता कर्मचारी या ‘आरोग्य सैनिकांना’, भरती करण्यात आलेल्या रुग्णाला व आर्थिकदृष्ट्या गरिबांना गर्दी न करता फळे देण्याचं मी आवाहन करतो. यामुळे कोरोनाशी फाईट करण्याची त्यांची क्षमता वाढेल व संकटातील शेतकऱ्यांनाही आधार मिळेल,” असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here