यांना आता स्वतःच बनवलेलं औषध कडू लागतंय, राष्ट्रवादीचा भाजपला टोला
भाजपाने तयार केलेले ‘सोशल’ औषध आता त्यांनाच कडू लागत असल्याचा, टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपाला लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे.
सोशल मिडियाच्या माध्यमातून टीका आणि अश्लील शिवीगाळ किंवा टिप्पणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली जात असल्याची तक्रार भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना आक्रमकपणे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.
याच विषयावर भाष्य करताना क्लाईड क्रास्टो यांनी भाजपाने तयार केलेले ‘सोशल’ औषध आता त्यांनाच ‘कडू’ लागत असल्याचे व्यंगचित्र काढून भाजपावर निशाणा साधला आहे. क्लाईड क्रास्टो नेहमीच व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपवर प्रहार करत असतात.
दरम्यान, सोशल मीडियावर ट्रोल प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा सरकारच्या कार्यकाळात “आघाडी बिघाडी” , ” देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र” या फेसबुकच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांवर चालू केलेल्या टीकेचा भाजपा नेत्यांना जाब विचारला आहे