Skip to content Skip to footer

मला अजिबात धक्का बसलेला नाही – पंकजा मुंडे

मला अजिबात धक्का बसलेला नाही – पंकजा मुंडे

भाजपाने विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रथमच ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ‘पक्षाच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. उमेदवारी मिळालेल्या चौघांनाही माझे आशीर्वाद आहेत, असे सूचक ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यापैकी चार जागा निवडून आणण्याची संधी भाजपाला आहे. चारही जागांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, शेवटच्या क्षणी चौघांचाही पत्ता कापून पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली. खडसे यांनी त्यावर तात्काळ आपली नाराजी नोंदवली. मात्र, पंकजा मुंडे काही बोलल्या नव्हत्या. शुक्रवारी रात्री उशिरा ट्विट करून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

पक्षानं उमेदवार यादी जाहीर केल्यापासून दिवसभर फोन येते होते. कार्यकर्ते दु:ख व्यक्त करत होते. पण मी फोन उचलला नाही. कुणाकुणाला उत्तर देऊ,’ अशी खंत पंकजा यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. ‘वाघांनो, असं रडू नका. मी आहे ना! तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही… साहेबांचे आशीर्वाद आहेत,’ असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

Leave a comment

0.0/5