बकरे कापण्याऐवजी आपल्या मुलांचा बळी द्या, भाजपा आमदाराचं वक्तव्य
“सनातन धर्मात आधी बळी दिला जात होता, पण आता त्याऐवजी नारळ फोडला जातो. बकरा कापला जात नाही. त्याचप्रमाणे इस्लाम धर्म मानणाऱ्यांना माझी विनंती आहे. तेदेखील आपल्या पवित्र गोष्टीची, आपल्या मुलांचा बळी देत नाहीत. जर कोणी म्हणत असेल मला कुर्बानी द्यायची आहे तर त्याने आपल्या मुलांची कुर्बानी द्यावी. निर्दोष जनावराचा बळी देऊन त्याचं सेवन केल्याने पुढील जन्मात त्यालाही बकरा व्हावं लागेल आणि लोक त्याला खातील. हा निसर्गाचा नियम आहे. ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला भोगावं लागतं,” असं नंदकिशोर गुर्जर यांनी म्हटलं आहे.
देशात सध्या करोनाने थैमान घातलं असून अद्यापही त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेलं नाही. संकटाच्या या काळात सरकार वारंवार लोकांना धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम टाळण्याचं आवाहन करत आहे. सोबतच बकरी ईद तसंच इतर सण घरातच साजरे करण्याचं आवाहन केलं जात आहे.
बकरी ईद: सरकारच्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी नाही-नवाब मलिक
दरम्यान महाराष्ट्रात बकरी ईद साजरी करण्याबाबत जी नियमावली जाहीर झाली आहे त्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. वाहतुकीसंदर्भात जे काही गैरसमज होते तेदेखील आता दूर झाले आहेत असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बकरी ईद साजरी करण्याबाबत जे गैरसमज होते त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.