सर्व काही उघड म्हणणारे जबाबदारी घेतील का? – मुख्यमंत्री
नवी मुंबई पालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम पुढील महिन्याभरात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. तसेच राज्यभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे तो कमी करण्याच्या प्रयत्न याद्वारे केला जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
राज्यातील शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या परिस्थितीत सर्वकाही उघडा उघडा बोलणारे जबाबदारी घेतील का? रुग्ण वाढले की पुन्हा खापर फोडायला सरकार आहेच, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा आणि वंचित तर्फे मंदिरे खुली करण्यासाठी सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. अनेकदा सरकारवर टीकाही केली आहे. त्या आंदोलनाचा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला.
ते म्हणाले, मागील अनेक महिन्यांपासून राज्य सरकार कोरोनाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. काही शहरात सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे; परंतु आता सर्वच काही बंद ठेवून चालणार नाही. त्याकरिता मिशन बिगिन अगेनच्या नावाखाली आपण हळूहळू काही गोष्टी सुरू करीत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा नियंत्रणात आलेले रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. गणेशोत्सवानंतर रुग्णांची संख्या वाढल्याचे उघड होत आहे. त्यामुळे आपण ही नवी मोहीम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.