खडसेंना पक्षात घेण्यास राष्ट्रवादी उत्सुक ; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा दावा !!
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यात खडसे लवकरच त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत होती. त्यात आता राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने हा गोष्टीला दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची एक महत्वाची बैठक शरद पवार यांनी घेतली होती. या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल चर्चा झाल्याची माहिती पुढे आली होती. आता खडसेंच्या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांचा विरोध नसल्याची माहिती पुढे आली आहे.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आपला कोणताही विरोध नाही. उलट ते आल्यास पक्षाला राज्यात मोठा फायदा होईल, असे मत आपण पक्ष नेत्यांकडे व्यक्त केले असल्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केले. देवकर म्हणाले की, ‘खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर जिल्ह्यात कोठे कोठे व राज्यात कसा फायदा होईल हे जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितले. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघासह राज्यात फायदा होईल, असे सांगितले. त्यांच्या प्रवेशाला माजी मंत्री यांनी विरोध केला असे सांगितले जात आहे ते चुकीचे आहे. आपण त्यांच्या पक्ष प्रवेशाला कोठेही विरोध केला नाही’, असे देखील देवकर यांनी स्पष्ट केले.