माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांच्यामुळेच मी राज्याचा मंत्री झालो ! – शंकरराव गडाख
अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार अनिलभैया राठोड यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. आज सर्वपक्षीय नेते तसेच कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राठोड यांच्या प्रतिमेला मंत्री शंकरराव गडाख यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
अनिल राठोड यांच्या जाण्याने नगर शहराची हानी झाली आहे. ती भरून निघणे अशक्य आहे. शिवसेना आणि स्व.अनिल राठोड हे समीकरणच होते. त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून गरिबांचे कुटुंब चालविण्याचे अखेरच्या श्वासापर्यंत काम केले, असे वक्तव्य मंत्री गडाख यांनी केले.
पुढे बोलताना गडाख म्हणाले की, सर्वसामान्य माणसांसाठी मोठ्या अधिकाऱ्यांना अंगावर घेण्याची धमक अनिल राठोड यांच्यात होती. त्यांनी गोरगरीब जनतेसाठी काम केले म्हणून ते २५ वर्षे आमदार होते. अनिलभैय्यांच्या जाण्याने अहमदनगर शहराची तसेच शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. मला राज्याचे मंत्रीपद मिळण्यात स्व.राठोड यांचे सहकार्य होते, असे गडाख म्हणाले.