महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो चांगला नव्हता – सामना
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला हाणला आहे. पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत असे म्हणणार सामंतु टोला हाणला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. “जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होते. दोन-अडीच तास चहा बिस्कीटावर तर चर्चा होणार नाही असंही ते म्हणाले होते. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावाही केला होता.
राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. सरकार दिवसरात्र काम करते व पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत, असेही शिवसेनेनं म्हटले आहे