फेसबुकक आणि ट्विटरने त्या फेक अकाउंट्च्या मालकांची नावे जाहीर करावी – राष्ट्रवादी
महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर ८० हजार फेक अकाउंट उघडण्यात आले होते, अशी माहिती मुंबई आयुक्त सिंह यांनी दिली होती. याच प्रकरणावरून आता राष्ट्रवादी आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्यासाठी उघडण्यात आलेल्या फेक अकाउंटची माहितीची द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात फेसबुक आणि ट्वीटरवर ८० हजार फेक अकाऊंट उघडण्यात आली. यातून सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी आणि मंत्र्यांची बदनामी करुन बिहारच्या निवडणूकीत राजकीय फायदा होईल यासाठी ही अकाऊंट उघडण्यात आल्याचा पर्दाफाश मिशीगन युनिव्हर्सिटीच्या नामांकित लोकांनी तयार केलेल्या अहवालात केला आहे.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपाने व त्यांच्या आयटी सेलने महाविकास आघाडी व मुंबई पोलिसांना बदनाम केल्याचे आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचे मिशीगन युनिव्हर्सिटीच्या अहवालात नमूद आहे, असेही महेश तपासे यांनी सांगितले. दरम्यान एखाद्या खटल्याचा किंवा प्रकरणाचा न्यायालयीन तपास सुरू असताना कोणताही मिडिया ट्रायल होवू नये असा भविष्यामध्ये केंद्राने कायदा करावा अशीही मागणी महेश तपासे यांनी यावेळी केली.