Skip to content Skip to footer

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवारांचे सूचक वक्तव्य !


खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवारांचे सूचक वक्तव्य !

भाजपचे जेष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षात संभाव्य प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ‘खडसेंचं कर्तृत्व, काम आणि खान्देशातील त्यांच्या स्थानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही’, असे पवार यांनी म्हटल आहे. यावरून आता पवारांच्या या वक्त्यव्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवसीय उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. रविवारी त्यांनी तुळजापूर येथे शेतकऱ्याशी संवादही साधला होता. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकार माध्यमाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना शेतीविषयी प्रश्नांसोबत अनेक राजकीय प्रश्न सुद्धा विचारण्यात आले होते. यावेळी त्यांना खडसें बाबत विचारण्यात आले असता यावर पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र यावेळी पवारांनी खडसें संदर्भात थेट बोलणे टाळले.

यावेळी खडसे यांच्याबद्दल बोलताना पवार म्हणाले की, ‘एकनाथ खडसे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते. अर्थमंत्री होते. आम्हाला शिव्या घालत होते. पण विरोधकांच्या बाजूने ते प्रखरतेने दिसत होते.

मात्र भाजपने दुर्दैवानं त्यांची नोंद घेतली नाही असे त्यांना वाटते. त्यामुळं जिथे नोंद घेतली जाईल, तिथे जाण्याचा त्यांचा विचार असल्याचे समजतं आहे. एखाद्या पक्षाबद्दल त्यांना विश्वास वाटत असेल तर आम्ही काय करू शकतो’, असा प्रतिप्रश्नही पवारांनी यावेळी केला.

Leave a comment

0.0/5