शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार!
यंदा राज्यावरच नाही तर संपूर्ण जगभरावर कोरोना संसर्गाचे संकट वावरत आहे. त्यातच मिशन बिगिनीग अगेन अंतर्गत अद्याप सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या दसरा मेळाव्यावरही कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे.
या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्क मैदानात न होता तो तेथूनच जवळ असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगमुळे या मेळाव्याला मोजक्याच निमंत्रितांना प्रवेश दिला जाणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा कायम शिवतिर्थावरच होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण ही शिवसैनिकांसाठी संजीवनी असायची. ही परंपरा आता उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही याबाबत चर्चा रंगल्या होत्या. पंरतु शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यंदा शिवसेनेचा मेळावा होणार असल्याचे जाहीर केले.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्यात राजकीय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. मात्र, यावेळच्या दसरा मेळाव्यावर कोरोनाचे सावट असल्याने मेळावा शिवतीर्थावर न होता शिवतीर्थाच्या समोरच असलेल्या सावरकर स्मारकात होणार आहे. तेथूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मेळाव्याला संबोधित करतील. सावरकर स्मारकातील सभागृहात मोजक्याच निमंत्रितांना प्रवेश देण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.