‘राष्ट्रवादी आल्याने मी टेन्शन फ्री झालो आहे, भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती’ – एकनाथ खडसे
भारतीय जनता पक्षाचे माजी वरिष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सोबत कन्या रोहिणी खडसे यांनी सुद्धा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता.
मात्र खडसे यांच्या पक्ष प्रवेशानंतर भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी आता त्यांच्यावर आरोप लावण्यास सुरुवात केली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी आता ‘राष्ट्रवादी नाथाभाऊंना गोळ्या देणार की चॉकलेट देणार’, असा सवाल उपस्थित करत टोला लगावला होता. तर पाटील यांच्या या टीकेला उत्तर देताना खडसे म्हणाले की, प्रवीण दरेकर आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेताना कोणते चॉकलेट दिले होते?, असा प्रतिप्रश्न पाटील यांना विचारला होता.
यावर आज एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद आयोजित करत ‘आता राष्ट्रवादी आल्याने मी टेन्शन फ्री झालो आहे, भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती’, असा टोला भाजपा नेत्यांना लगावला. तसेच शुक्रवारी पक्षांतर करतेवेळी ‘जर कोणी ईडी लावली तर त्याला आपण सीडी लावू’, असे नाव न घेता फडणवीसांनाही टोला त्यांनी लगावला होता.