पिंपरी भाजपमधील गृहकलह शिगेला

पिंपरी-भाजपमधील-गृहकलह-श-Pimpri-BJP-civil strife-sh

पक्षश्रेष्ठींच्या शिष्टाईने वादावर तूर्त पडदा

पिंपरी पालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच, सत्तारूढ भाजपमधील गृहकलह शिगेला पोहोचला. प्रत्येक गोष्टीत वाद होऊ लागले. यातून निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती आणि राजकीय नुकसान लक्षात घेऊन उशिरा का होईना पक्षश्रेष्ठींनी दखल घेत शिष्टाई केली. परिणामी, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर तूर्तास पडदा पडला आहे.

पिंपरीत भाजपला २०१४ नंतर संजीवनी मिळाली. राष्ट्रवादीसह इतर पक्षातील दिग्गज नेते भाजपमध्ये आले. राजकीयदृष्टय़ा ताकद वाढल्यानंतर लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१७ ला पिंपरी पालिका खेचून आणली. मात्र, भाजप वर्तुळात हा आनंद फार काळ टिकला नाही. नव्या-जुन्यांचा सातत्याने वाद होऊ लागला.

सगळा कारभार नव्यांच्या हाती एकवटल्याने पक्षातील निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यातून पक्षात दरी निर्माण झाली. तेव्हा वेळीच हस्तक्षेप करून नेतृत्वाने ही दरी वाढू दिली नाही. त्यानंतरही, उपमहापौरपदावरून पुन्हा नव्या-जुन्याचा वाद उफाळून आला. शहराध्यक्षांची नाराजी दूर करण्यासाठी तोडगा म्हणून वर्षभराच्या मुदतीचे उपमहापौरपद दोघांसाठी सहा महिन्यांचे करण्यात आले.

दुसरीकडे, आमदार जगताप व लांडगे यांच्यात पालिकेतील वर्चस्ववादातून शह-काटशह सुरू झाला. पक्षात व पालिका वर्तुळात त्याचा अनेकांना फटका बसला. पालिकेचे महत्त्वाचे निर्णय असो, स्थायी समिती असो की, पालिका सभा, पक्षांतर्गत वादाचे पडसाद सर्वत्र उमटू लागले. दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत होती. उशिरा का होईना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली. मुंबईत फडणवीस, पाटील, जगताप, लांडगे यांच्यात प्रदीर्घ बैठक झाली. आपापसातील वाद तत्काळ मिटवण्याच्या सूचना दोन्ही आमदारांना करण्यात आल्या. त्यानुसार, एकोप्याने काम करण्याची ग्वाही दोन्ही आमदारांनी दिल्याचे सांगण्यात येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here