विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक मतबल नेत्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता. मात्र राजकीय समीकरणे बदलून राज्यात सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे आघाडी सरकार स्थापन झाले होते. त्यात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून भाजपाला जोरदार धक्का दिला होता.
आता त्या पाठोपाठ नवी मुंबईत सुद्धा शिवसेना भाजपाला जोरदार धक्का देणार आहे अशी माहिती खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे. नवी मुंबई महापालिकेतील तीन भाजपा नगरसेवकरांनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधण्याचे ठरवले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवीन गवते, दीपा गवते आणि अपर्णा गवते हे तीन नगरसेवक शिवसेनेत जाणार आहेत. हे तीन नगरसेवक भाजपचे माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. मात्र, त्यांच्या जाण्याने भाजपसह गणेश नाईकांना नवी मुंबईत नुकसान होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.