आदित्य ठाकरे म्हणजे आजोबांच स्वप्न पूर्ण करणारा खरा नातू – सुधीर मुनगंटीवार
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर होणारच, असे युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. आज ते विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी संभाजीनगर येथे दुपारी दाखल झाले होते. आता त्यांच्या या निर्णयाचे खुद्द भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी नामांतर करून दाखवल्यास त्यांचे पहिले अभिनंदन मी करेन, असे सांगतानाच आदित्य म्हणजे आजोबांचे स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असलेला खरा नातू आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव करू असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य यांचे कौतुक केले. आदित्य ठाकरेंनी औरंगाबादचे नामांतर केल्यास त्यांची ऊंची तरुणांच्या मनात सह्याद्रीच्या पर्वतापेक्षा मोठी होईल. संभाजी महाराज देवासोबत जिथे कुठे बसले असतील तिथून त्यांना आशीर्वाद देतील. विधानसभेत भाजपतर्फे आदित्य यांच्या अभिनंदानाचा प्रस्ताव मांडणारा आमदार मी असेन, असे सुधीर मुनंगटीवार यांनी सांगितले.