Skip to content Skip to footer

वृक्षतोडीमुळे कर्जत तालुक्यातील जंगले भकास

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. राक्षसवाडी, तळवडी, धालवडी, कुळधरण, कोपर्डी येथील जंगलात वृक्षतोडीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. वन विभागाच्या अधिकार्‍यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोड वाढत चालली आहे.

कुळधरण नजीकच्या मोतीरा तसेच कोपर्डी भागातील वाड्यावस्त्यांवर लाकडांचे मोठमोठे ढीग जमा करून ठेवलेले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून समोर येत आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वनक्षेत्राकडे फिरकतच नसल्याने वृक्षतोडीत कमालीची वाढलेली दिसत आहे. त्यामुळे जंगले विरळ झालेली आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र उजाड झाले आहे. जंगले भकास होत आहे. खैर, निलगिरी, लिंब या झाडाची सर्वाधिक कत्तल केली जाते. मोठ्या झाडांची व्यवस्थित विल्हेवाट लावली जात आहे. काही ठिकाणी लाकडाच्या विक्रीचे प्रकारही घडत आहेत. सायंकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान झाडांची तोड होते. खैर, निलगिरी, लिंब या झाडाची मोठमोठे ओंडके या भागात साठवून ठेवले जातात. वन विभागाचे अधिकारी कामात कुचराई करत असून त्यांचे वनक्षेत्रावर नियंत्रण दिसत नाही. अनेक भागात वन्य प्राण्यांची शिकार केली जाते. वन कर्मचार्‍यांनी रात्रीची गस्त घातल्यास वन्यप्राण्याचा बचाव करता येऊ शकेल. मात्र, अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत.

कर्मचार्‍यांचा छुपा पाठिंबा

वन क्षेत्रात होणार्‍या झाडांच्या कत्तलीला वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी जबाबदार आहेत. कर्मचार्‍यांच्या छुप्या पाठिंब्यानेच हे प्रकार चालत असल्याचे दिसते. वृक्षतोड थांबविण्यासाठी गॅसचे वाटप करण्याचे शासकीय धोरण आहे. मात्र, त्याची नीट अंमलबजावणी होत नाही.- आप्पा तुरकुंडे तळवडी, ता कर्जत

Leave a comment

0.0/5