मुंबई : ग्रुपसोबत पिकनिक किंवा हँगआऊटचा प्लॅन करायचा असेल, तर चर्चेसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटिंगचा ऑप्शन बरा पडतो. मात्र ग्रुपमध्ये टायपिंग करुन बोटं दुखत असल्यास आता तुम्हाला ग्रुप व्हिडिओ कॉल करता येणार आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या यूझर्ससाठी हा नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
आयओएस आणि अँड्रॉईड डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप यूझर्सना व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. एका वेळी चार यूझर्ससोबत तुम्ही ग्रुप व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल करु शकाल. मे महिन्यातच व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकने यासंदर्भात घोषणा केली होती.
ग्रुप व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल कसा कराल?
एका व्यक्तीला व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल करा. उजव्या कोपऱ्यात ‘अॅड पार्टिसिपंट’ असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करुन तुम्ही कॉन्टॅक्ट्समधील व्यक्तींना सुरु असलेल्या व्हिडिओ कॉलमध्ये अॅड करु शकाल.
व्हॉट्सअॅप यूझर्स सध्या दररोज दोनशे कोटी मिनिटं व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलवर व्यतित करतात. ग्रुप कॉल एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असतील, याची हमी व्हॉट्सअॅपने दिली आहे.