कोलकाता : ‘आणखी पाच-सहा षटकांचा खेळ होऊ शकला असला असता, तर सामना आमच्या बाजूने झुकला असता’, अशी भावना भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के. एल. राहुल याने व्यक्त केली.
कर्णधार विराट कोहलीच्या शतकानंतर महंमद शमी-भुवनेश्वर कुमार-उमेश यादव या वेगवान त्रिकुटाने काल (सोमवार) श्रीलंकेला पराभवाच्या उंबरठ्यावर नेले होते.
पण अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला आणि भारत-श्रीलंकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
परदेशी पक्षांचे आगमन…फोटोस पहा..!!
https://maharashtrabulletin.com/birds-winter-migration/
सामन्यानंतर राहुल म्हणाला, “आम्हाला या सामन्यात निकाल अपेक्षित होता. पण पाचव्या दिवसाच्या शेवटचा काही वेळ पुरेसा प्रकाश नव्हता. त्याबद्दल आम्ही काहीच करू शकत नव्हतो. आणखी पाच किंवा सहा षटकांचा खेळ झाला असता, तर निकाल लागू शकला असता.
” सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी वेळकाढूपणा केल्यामुळे दोन्ही संघांमध्ये मैदानात काही काळ शाब्दिक चकमक उडाली होती.
याविषयी राहुल म्हणाला, “चुरशीचा सामना असाच होतो. पराभव सर्वांनाच नकोसा असतो.. अशा क्षणी प्रत्येक संघ काही ना काही क्लुप्ती वापरत असतो.
त्यात काही गैर आहे, असं नाही. आम्हीही हा सामना जिंकण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होतो आणि जास्तीत जास्त षटकांचा खेळ होण्यासाठी प्रयत्नशील होतो.”
पावसामुळे सामन्यातील बराचसा वेळ वाया गेला असला, तरीही अखेरच्या दिवशी भारतीय संघाने विजयासाठी योजनाबद्ध प्रयत्न केले होते. ‘मैदानावर सकारात्मक खेळ करण्याचाच आमचा दृष्टिकोन होता.
आणखी 200-250 धावा करून श्रीलंकेला आव्हानात्मक लक्ष्य देण्याचा आमचा प्रयत्न होता. सुरंगा लकमलच्या पहिल्या स्पेलमध्ये तीन फलंदाज गमावल्यामुळे आमच्या योजनेला थोडासा धक्का बसला.
त्यामुळे आमची फलंदाजी थोडी लांबली’, असेही राहुलने सांगितले.