Skip to content Skip to footer

सिंधूच्या विजयाने भारताचे आव्हान कायम

बॅंकॉक (थायलंड) : महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने मिळविलेल्या विजयामुळे थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान कायम राहिले. यापूर्वी पुरुष एकेरी आणि दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले.

सिंधूने दुसऱ्या फेरीच्या लढतीत हॉंकॉगच्या पुई यिन यीप हिचे आव्हान 21-16, 21-4 असे सहज मोडून काढत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिच्यासमोर आता मलेशियाच्या सोनिया छेह हिचे आव्हान असेल. सिंधूचा “ड्रॉ’ लक्षात घेता, तिला प्रतिस्पर्धीच नसल्याने तिची अंतिम फेरी निश्‍चित मानली जात आहे. दुसऱ्या “ड्रॉ’मधून अकाने यामागुची, नोझोमी ओकुहारा, आया ओहोरी या जपानच्या तगड्या प्रतिस्पर्धींनी आगेकूच केली आहे.

त्यापूर्वी, पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय याला पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या सोनी द्वि कुनसोरो याने प्रणॉयचे आव्हान 21-18, 21-14 असे परतवून लावले. पहिल्या गेमला आघाडी घेऊनही प्रणॉयने लढतीवरील नियंत्रण गमावले. कुनसोरो याने सलग पाच गुण मिळवत पहिली गेम जिंकली आणि त्यानंतर मागे वळून बघितले नाही. पी. कश्‍यप याने जपानच्या कांटा त्सुनेयामा याला झुंजवले खरे, पण त्याला विजयाला गवसणी घालता आली नाही. कांटाने काश्‍यपचा प्रतिकार 21-18, 18-21, 19-21 असा परतवून लावला.

पुरुष दुहेरीत मनू अत्री-सुमीथ रेड्डी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. हिरोयुकी एंडो-युता वातांबे या जपानी जोडीने त्यांचा 22-24, 21-13, 21-19 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा-सत्विकसाईराज रंकीरेड्डी यांना जपानच्याच युकी कानेको-मायु मात्सुमोटो जोडीकडून 11-21, 16-21, असा पराभव पत्करावा लागला.

Leave a comment

0.0/5