Skip to content Skip to footer

साईना नेहवाल आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत

नान्जिंग (चीन)/मुंबई : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम साईना नेहवाल ने केला. हा पराक्रम केलेली ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली. भारताच्या पी. व्ही. सिंधू, तसेच बी. साई प्रणीतनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; पण किदांबी श्रीकांतचे आव्हान आटोपले आहे. सिंधूची लढत तिची मॅरेथॉन लढतींतील प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहाराविरुद्ध होईल.

साईनाने माजी जागतिक विजेत्या रॅचनॉक इनतॉन हिला 21-16, 21-19 असे पराजित केले. तिसऱ्या मानांकित सिंधूने नवव्या मानांकित सुंग जी ह्यून हिचा 21-10, 21-18 असा पाडाव केला. बी साई प्रणीतने पुरुष एकेरीतील आव्हान राखताना डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्तिएन सॉलबर्गला 21-13, 21-11 असे नमवले. भारताचे आशास्थान असलेला श्रीकांत मलेशियाच्या डॅरेन लिऊविरुद्ध 18-21, 18-21 असा पराजित झाला.

साईनाचा हा इनतॉनविरुद्धचा सलग चौथा विजय आहे. साईनाने सुरवातीपासून हुकूमत घेत इनतॉनवरील दडपण वाढवले. बचाव आणि आक्रमणाची सुरेख सांगड घातलेल्या साईनाच्या फसव्या रॅलीजनी इनतॉनला चुका करण्यास भाग पाडले. पहिल्या गेममधील 5-8 पिछाडीनंतर धडाका सुरू करीत झटपट पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये साईनाने क्वचितच प्रतिस्पर्धीस संधी दिली; पण 13-18 पिछाडीवर असताना इनतॉन आक्रमक झाली. तिने 19-19 बरोबरीही साधली; पण याच वेळी साईनाला मार्गदर्शक गोपीचंद यांनी सूचना केली आणि साईनाने दोन गुण जिंकत गेम तसेच लढतही जिंकली. “”पहिल्या गेममधील अखेरच्या दोन गुणांचे श्रेय गोपी सरांना आहे. त्यांची सूचनाच मी अमलात आणली,” असे सांगतानाच एकंदरीत या लढतीतील खेळ सुखावणारा होता, असे तिने सांगितले.
सिंधूने लौकिकास साजेसा खेळ करताना वेगवान आक्रमक खेळ केला. तिच्या स्मॅशेसना सुरुवातीस प्रतिस्पर्धी उत्तरही देऊ शकली नाही. दुसऱ्या गेममध्ये ती जास्तच आक्रमक झाली. त्यामुळे तिच्याकडून चुका झाल्या; पण योग्य वेळी सावरत विजय मिळवल्याचे तिला समाधान होते. श्रीकांतला मोक्‍याच्यावेळी संधी साधण्यात अपयश आले. त्याला स्मॅशच्या वेळी शटलवर नियंत्रण राखता आले नाही. प्रणीतने मात्र संयमी खेळ करीत आगेकूच केली.

कॅरोलिन मरिन खूपच आक्रमक आहे. आमच्या दोघीत दीर्घ कालावधीनंतर लढत होत आहे. या आव्हानात्मक लढतीतच नव्हे तर आगामी सर्वच लढतीत सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न असेल.
– साईना नेहवाल

नोझोमी ओकुहाराबरोबर गेल्या काही महिन्यांत सातत्याने लढत होत आहे. दोघी एकमेकींचा खेळ जाणतो. अर्थातच या वेळी दीर्घ लढत जिंकण्याचेच लक्ष्य आहे. त्यासाठी पुरेशी विश्रांती घ्यायची आहे. पुरेशी झोप महत्त्वाची असेल.
– पी. व्ही. सिंधू

सात्त्विक-अश्‍विनी पदकापासून एक विजय दूर
सात्त्विक साईराज-अश्विनी पोनप्पाने मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ते पदकापासून एकच विजय दूर आहेत. सात्त्विक-साईराजने उपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकली तर भारत प्रथमच मिश्र दुहेरीत जागतिक पदक जिंकेल. त्यांनी जागतिक क्रमवारीत सातव्या असलेल्या सून हुआत गोह आणि शेवॉन जैमी लाई यांना 20-22, 21-14, 21-6 असे हरवले. “”राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियाच्या जोडीला हरवले होते. त्यामुळे विजयाची आशा होतीच; मात्र जागतिक स्पर्धेतील आव्हान खडतर असते. त्यात यशस्वी ठरल्याचे समाधान आहे. अजूनही अपेक्षेइतका चांगला खेळ होत नाही, याची सल आहे. या स्पर्धेत आमची सर्वोत्तम कामगिरी होईल, असा विश्‍वास आता वाटत आहे,” असे अश्‍विनीने सांगितले.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5