जाकार्तात सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत कुस्ती प्रकारात ऑलिंपियन सुशील कुमारने निराशा केली असतानाच बजरंगा ने म्हणजेच बजरंग पुनिया ने ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविल्यावर कुस्ती हॉलमध्ये ‘जय बजरंग, जय बजरंग!’ अशा घोषणा घुमल्या नसत्या तरच नवल होते. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत त्याने गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकाचा रंग बदलला.
अतिशय आक्रमक आणि गतिमान कुस्ती खेळण्याच्या तंत्राने जपानच्या ताकातानी दायची याचा ११-८ असा पराभव करून त्याने सोनेरी यश मिळविले.
बजरंगने आक्रमक सुरवात करताना सहा गुण मिळविले, तेव्हा अंतिम लढत एकतर्फी होणार असेच वाटले. मात्र, जपानच्या ताकातानी याने बजरंगचा कच्चा दुवा शोधून घोट्यातून काढलेल्या पट डावावर ४ गुणांची कमाई करून लढतीत रंग भरले. दुसऱ्या फेरीत त्याने हेच तंत्र अवलंबून दोन गुण मिळवत बरोबरी साधली. बरोबरीनंतर बजरंग सावध झाला. ताबा मिळवत त्याने दोन गुणांची कमाई करून पुन्हा आघाडी घेतली. वेळ संपत असताना ताकातानीने पुन्हा एकदा बजरंगच्या घोट्यातून गुण वसूल करण्याची खेळी खेळली. या वेळी बजरंग दक्ष होता. त्याने तशाच स्थितीत एक चाक डाव करत दोन गुण मिळविले. मात्र, त्या वेळी कुस्ती धोकादायक स्थितीत गेल्याने ताकातानीलाही दोन गुण देण्यात आले. अखेरच्या २२ सेकंदांत ११-८ अशा स्थितीत असताना ताकातानीचा डाव उधळून लावत बजरंगने सुवर्णपदकावर नाव कोरले.