Skip to content Skip to footer

हैदराबाद सोडून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी शिखर धवन

मुंबई : काही वृत्तांनुसार, सनरायझर्स हैदराबादची साथ सोडून शिखर धवन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. पुढच्या आयपीएल मोसमात नव्या संघात आयपीएलमधील स्टार खेळाडू आणि टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन दिसू शकतो. हैदराबादच्या फ्रँचायझींवर धवन नाराज असल्यामुळे संघ सोडण्याची तयारी त्याने केल्याची चर्चा आहे.

२०१३ पासून सनरायझर्स हैदराबादकडून शिखर धवन खेळत आहे. पण अकराव्या मोसमापूर्वी झालेल्या लिलावापूर्वी टीमने त्याला रिटेन न केल्यामुळे तो नाराज आहे. राईट टू मॅच कार्डचा वापर करुन हैदराबादने शिखर धवनला खरेदी केले होते. ५.२ कोटी रुपयांची बोली त्याच्यावर लागली होती. शिखर धवनला अत्यंत कमी किंमत मिळाल्यामुळेही तो नाराज असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे रोहित शर्मा (१५ कोटी), महेंद्र सिंह धोनी (१५ कोटी) आणि विराट कोहली (१७ कोटी) हे सर्वात महागडे खेळाडू ठरले होते.

‘मुंबई मिरर’शी बोलताना सनरायझर्स हैदराबादच्या अधिकाऱ्याने सांगितले, की ट्रेड ऑफच्या माध्यमातून फ्रँचायझींना काही चांगले खेळाडू मिळाले तर हे शक्य आहे. म्हणजेच शिखर धवनच्या मोबदल्यात हैदराबादला काही चांगले खेळाडू मिळाले तर त्याला रिलीज केले जाईल. मुंबई इंडियन्सनेही ट्रेड ऑफच्या माध्यमातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या क्विंटन डी कॉकला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतले आहे. या बदल्यात बांगलादेशचा मुस्ताफिजुर रहमान आणि श्रीलंकेच्या अकिला धनंजयला रिलीज केले होते.

Leave a comment

0.0/5