नागपूर। आज(5 मार्च) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकात सर्वबाद 250 धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी 251 धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारताकडून कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली आहे. त्याने 120 चेंडूत 116 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 10 चौकार मारले. त्याचबरोबर त्याने वनडेमध्ये 1000 चौकारांचा टप्पाही गाठला आहे.
त्यामुळे वनडेमध्ये 1000 किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारणारा विराट भारताचा चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. तर जगातील 12 वा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली या भारतीय क्रिकेटपटूंनीच वनडेमध्ये 1000 चौकारांचा टप्पा पार केला आहे.
विराटला या सामन्यात 48 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॅट कमिन्सने बाद केले. त्याचा झेल मार्कस स्टॉयनिसने घेतला. विराटने आज केलेले शतक हे त्याचे वनडेमधील 40 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 65 वे शतक ठरले आहे.
विराटने भारताचा डाव सांभाळताना विजय शंकरबरोबर चौथ्या विकेटसाठी 81 धावांची तर जडेजा बरोबर सातव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली.
वनडेमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू-
2016- सचिन तेंडूलकर
1132- विरेंद्र सेहवाग
1122- सौरव गांगुली
1000- विराट कोहली