उद्या(8 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा वनडे सामना रांची येथील जेएससीए स्टेडीयमवर होणार आहे. हे मैदान भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे घरचे मैदान आहे. त्यामुळे या मैदानावरील एका स्टँडला झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने धोनीचे नाव दिले आहे.
या स्टँडला ‘एमएस धोनी पॅव्हेलियन’ असे नाव देण्यात आले आहे. पण याचे उद्धघाटन करण्यास धोनीने नकार दिला आहे.
याबद्दल झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवआशिष चक्रवर्ती यांनी सांगितले की, ‘मागील वर्षी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत निर्णय घेण्यात आला की मीडिया संलग्नक आणि व्हीआयपी बॉक्स यांचा समावेश असणाऱ्या नॉर्थ ब्लॉक स्टँडला धोनीचे नाव देण्यात यावे.’
तसेच चक्रवर्ती यांनी सांगितले की धोनाने या स्टँडचे उद्घाटन करण्यास नकार दिला.
ते म्हणाले, ‘आम्ही त्याला विनंती केली होती. पण तो आम्हाला म्हणाला, ‘दादा अपने ही घर मै क्या इनॉग्रेट करना.(आपल्याच घरी काय उद्धाटन करायचे)’ तो अजूनही खूप विनम्र आहे.’
याआधीही भारतात मैदानातील स्टँडला क्रिकेटपटूंची नावे देण्यात आली आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या नावाचे स्टँड आहे, तर दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडीयमच्या गेटला विरेंद्र सेहवागचे नाव देण्यात आले आहे.
उद्या होणारा हा सामना धोनीचा घरच्या मैदानावर होणारा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असण्याची शक्यता आहे. पण झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की यासाठी काही खास योजना आखण्यात आलेली नाही.
या मैदानावर आत्तापर्यंत एक कसोटी, चार वनडे आणि दोन टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. तसेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाबरोबर या मैदानावर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील सामने खेळले आहेत. पण त्यातील वनडे सामना पावसामुळे पूर्ण झाला नव्हता.