रांची। जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर आज(8 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 314 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आहे. भारताने 27 धावांतच 3 गमावल्या होत्या. पण त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कर्णधार म्हणून विराटने एक खास विश्वविक्रमही केला आहे.
या सामन्यात जेव्हा विराटने 27 वी धाव घेतली तेव्हा त्याने कर्णधार म्हणून वनडेमध्ये 4000 धावांचा टप्पाही पार केला. हा टप्पा त्याने कर्णधार म्हणून 63 व्या डावात पूर्ण केला आहे. त्यामुळे तो वनडेमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारा कर्णधार ठरला आहे. त्याने एबी डिविलियर्सला मागे टाकले आहे. डिविलियर्सने 77 डावात हा टप्पा गाठला होता.
तसेच वनडेमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000, 2000, आणि 3000 धावा करण्याचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे.
त्याचबरोबर 4000 धावांचा टप्पा पार करणारा तो भारताचा चौथा तर जगातील 12 वा कर्णधार ठरला आहे. याआधी भारताकडून एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दिन आणि सौरव गांगुली यांनी हा पराक्रम केला आहे.
वनडेमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारे कर्णधार-
63 डाव – विराट कोहली
77 डाव – एबी डिविलियर्स
100 डाव – एमएस धोनी
103 डाव – सौरव गांगुली
106 डाव – सनथ जयसुर्या