रांची। शुक्रवारी(8 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा वनडे सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने नेहमीची निळी कॅप न वापरता भारतीय आर्मीच्या रंगाची कॅप आज वापरली होती. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना याद्वारे खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली आहे.
यावेळी संघातील खेळाडूंना माजी कर्णधार आणि लोकल बाॅय एमएस धोनीच्या हस्ते कॅप देण्यात आली होती. या सामन्यात मिळणारी सर्व फी भारतीय संघ पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या परिवारासाठी देणार असल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्याआधी सांगितले होते.
मात्र भारतीय संघाने आर्मी कॅप घालून या सामन्यात खेळण्यावर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी म्हटले आहे की आयसीसीने भारतीय संघाविरुद्ध कारवाई करावी.
पाकिस्तान मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार कुरेशी म्हणाले, ‘पूर्ण जगाने पाहिले की भारतीय संघ त्यांची नेहमीची कॅप न घालता आर्मी कॅप घालून खेळले. पण हे आयसीसीने पाहिले का? आम्हाला असे वाटते की पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ही गोष्ट पुढे आणण्यापेक्षा आयसीसीवर याकडे लक्ष देण्याची जबाबदारी आहे.’
तसेच पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनीही याबद्दल ट्विट करत चिंता व्यक्त केली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘हे फक्त क्रिकेट नाही, मला आशा आहे की आयसीसी याबद्दल कारवाई करेल. जर भारतीय संघाने ही गोष्ट थांबवली नाही तर पाकिस्तान क्रिकेट संघही काश्मिरमध्ये भारताकडून होणाऱ्या आत्याचाराबद्दल काळी पट्टी बांधून जगाला आठवण करुन देईल.’