तुझ्यात जिम्नॅस्टिकमध्ये अपूर्व कामगिरी साकारण्याचे टॅलण्ट आणि जिद्द आहे. हिंदुस्थानात तुला तुझे कौशल्य विकसित करण्यासाठीची हायटेक सर्व सुविधा आहे. मग प्रदीर्घ काळ परदेशात प्रशिक्षण अथवा सरावासाठी जाण्याचा विचारही करू नको.त्यासाठी जायचे असेल तर केवळ वातावरणाच्या बदलासाठी फार तर एक अथवा दोन आठवड्यांसाठी परदेशात जा ! असा कानमंत्र पाचवेळा ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकचे सुवर्णपदक पटकावणारी जिम्नॅस्टिकची माजी अनभिषिक्त सम्रादनी रोमानियाची नादिया कॉमेन्सी हीने हिंदुस्थानची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिला दिला आहे.
टोकियो ऑलिम्पिकसाठी पूर्वतयारी करणाऱ्या दीपाला नादियाने देशातच अधिक सर्व कर.कारण तुझ्या देशात तुझे जिम्नॅस्टिकचे कसब विकसित करण्याच्या आधुनिक सुविधा आहेत. वारंवार परदेशात प्रशिक्षणासाठी जाऊन आपला अमूल्य वेळ वाया घालविण्याची तुला गरजच नाही असा सल्ला दिला आहे. प्रोडूनोवा या कठीण आणि धोकादायक जिम्नॅस्टिक प्रकारात दीपाने मिळवलेल्या यशाने मीही चकित झाले आहे, असे कॉमेन्सी दीपाला शाबासकी देताना म्हणाली.
जिम्नॅस्टिक ही कुणा एका देशाची मक्तेदारी नाही
जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकार हा जगातल्या कुणा एका देशाची मक्तेदारी नाही.आतापर्यंत अमेरिका ,रशिया आणि रोमानिया या देशांनी ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धांत या खेळाची पदके पटकावली असतील.पण हिंदुस्थानच्या दीपाने या खेळात जिद्दीने मिळवलेले यश तिला भविष्यात ऑलिम्पिक पदक मिळवून देऊ शकेल असा विश्वासही नादियाने ‘ दीपा कर्माकर : दि स्मॉल वंडर ‘ या जिम्नॅस्टिकवरील पुस्तकाच्या प्रस्तावनेत व्यक्त केला आहे.