Skip to content Skip to footer

पाऊस थांबलाय, पण… बीसीसीआयनं दिली महत्त्वाची अपडेट

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. न्यूझीलंड : नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिजवरील सामन्यात पावसाचं सावट सध्यातरी दूर झालेलं आहे. पण, खेळपट्टी अजूनही झाकलेली आहे आणि मळभ कायम आहे. त्यामुळे सामना वेळेत सुरू होईल की नाही याबाबत साशंकता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोशल मीडियावरून ही माहिती दिलेली आहे. शिवाय न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचेही हेच म्हणणे आहे.

पावसाचा खेळ चाले… उपांत्य फेरीसाठी प्रयत्नशील असलेल्या संघांना धोका!
वर्ल्ड कप स्पर्धेत मागील चार दिवसांत पावसामुळे तीन सामने रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ओढावली. सोमवारी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मंगळवारी श्रीलंका आणि बांगलादेश या सामन्यावरही पावसानं पाणी फिरवलं. याआधी 7 जूनला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक सामने रद्द होण्याचा विक्रम यंदा नोंदवला गेला आहे. त्यात आज होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड लढतीवरही पावसाचे सावट आहे.
हा पाऊस क्रिकेट चाहत्यांना जेवढा त्रासदायक ठरत आहे त्याहून अधिक तो संघांसाठी ठरणार आहे. कारण संघांच्या कामगिरीपेक्षा आता पावसाच्या बॅटिंगवर उपांत्य फेरीचे समीकरण विसंबून राहणार असल्याचे दिसत आहे. आजच्या भारत-न्यूझीलंडच नव्हे, तर रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे मोठ्या संघांनाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती त्यांच्या उपांत्य फेरीचा मार्गही खडतर होऊ शकतो.

Leave a comment

0.0/5