तुम्हीही गुगलवर सर्च करून बघा ‘हे’ शब्द
अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान हा सध्या युएईमध्ये IPL 2020 स्पर्धेत सहभागी झाला आहे. राशिद खान हा सनरायझर्स हैदराबाद संघाचे (SRH) प्रतिनिधीत्व करत असून अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर दमदार कामगिरी करून दाखवत आहे. यंदाच्या हंगामात मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बाद करत त्याने संघासाठी उपयुक्त प्रदर्शन केले आहे. पण, सध्या मात्र राशिद खानचं नाव एका वेगळ्याच आणि मजेशीर कारणास्तव चर्चेत आलं आहे.
गूगल या प्रसिद्ध सर्च इंजिनमध्ये अविवाहित असलेल्या राशिद खानच्या पत्नीचं नाव बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा असल्याचं दाखवलं जात आहे. राशिद खानची पत्नी (Rashid Khan Wife) असं गुगलवर सर्च केल्यानंतर त्याच्या पत्नीचं नाव अनुष्का शर्मा असं उत्तर गुगलकडून दिलं जात आहे आणि नेटकरीदेखील या गोष्टीवरून गुगलची मस्करी करताना दिसत आहेत. राशिद खान हा २२ वर्षांचा अविवाहित तरूण आहे. तो अफगाणिस्तानचा नावाजलेला फिरकीपटू आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही टीम इंडिया आणि RCBचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी आहे. विराट-अनुष्का यांनी ११ डिसेंबर २०१७ला इटलीमध्ये लग्न केलं होतं आणि सध्या अनुष्का गरोदर आहे. सध्या अनुष्का विराटसोबत युएईमध्ये असून IPLचा आनंद लुटत आहे.
गुगलकडून का झाली असावी चूक?
अनुष्का शर्मा आणि राशिद खान या दोघांचा तसा थेट कोणताही संबंध नाही. पण गुगलने त्यांचा थेट पती-पत्नी असाच संबंध जोडला. याबाबत तज्ञ्जांच्या मते, राशिद खानने दिलेल्या मुलाखतीमुळे अशी चूक झाली असावी. २०१८मध्ये राशिद खानने इन्स्टाग्राम चॅटवर एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत राशिद खानला त्याच्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना त्याने अनुष्का शर्मा हिचं नाव घेतलं होतं. त्यावेळी राशिदचं ते उत्तर खूप चर्चेत राहिलं होतं आणि कदाचित म्हणूनच गुगलकडून अशी चूक झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.