Skip to content Skip to footer

IND VS ENG: वन डे संघात रोहित शर्माच्या जागी विराटच्या ‘या’ आवडत्या खेळाडूला स्थान मिळेल का? जाणून घ्या

महाराष्ट्र बुलेटिन : इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारताला पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने देखील इंग्लंडच्या संघाविरुद्ध खेळायचे आहेत. टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. त्यात रोहित शर्मालाही जागा मिळाली आहे. पण असेही वृत्त आहे की उपकर्णधार रोहितला एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते, कारण तो मागील वर्षी कोरोनामुळे क्रिकेटवर बंदी घालण्याच्या आधीपासून खेळत आहे. यादरम्यान, त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध देशांतर्गत एकदिवसीय मालिका, न्यूझीलंड दौर्‍यावर ५ टी-२० ची मालिका आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएल देखील खेळले होते. तो इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतही खेळत आहे. इतके दिवस बायो बबलमध्ये राहणे मानसिकरित्या खूप कंटाळवाणे आहे. त्यामुळे त्याला वन डे मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र, अशावेळी हा प्रश्न उपस्थित होतो की त्याच्याजागी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दुसरा सलामीवीर म्हणून कोणाला संधी मिळणार. कारण एक सलामीवीर म्हणून शिखर धवनचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे.

अलीकडील रेकॉर्ड पाहता कर्नाटकचा सलामीवीर फलंदाज देवदत पडिक्कल या भूमिकेत फिट असल्याचा दावा केला जाऊ शकतो. पडिक्कल गेली दोन वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला खेळत आहे. हा फलंदाज वनडे, कसोटी आणि टी-२० या तिन्ही स्वरूपात जोरदार धावा करीत आहे. यावर्षीही तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की देशांतर्गत वन-डे स्पर्धेत विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ५ सामन्यांत १९० पेक्षा जास्त सरासरीने ५७२ धावा केल्या आहेत.

त्याने प्रत्येक सामन्यात पन्नास किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. यावेळी त्याने सर्वाधिक तीन शतकेही केली आहेत. धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये पडिक्कलने सर्वाधिक 18 षटकार ठोकले आहेत. पडिक्कलने याच टूर्नामेंटमध्ये ओडिशाविरूद्ध आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठा १५२ धावांचा डाव साकारला होता. अशा परिस्थितीत रोहितच्या जागी त्याला दुसरा सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. मात्र, वनडे मालिकेच्या संघ निवडीनंतरच हे स्पष्ट होईल.

Leave a comment

0.0/5