Skip to content Skip to footer

अभिमानास्पद! ‘मिथाली राज’ नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या १०,००० धावा

महाराष्ट्र बुलेटिन : भारतीय महिला क्रिकेटची कर्णधार म्हणून कमान सांभाळणारी मिथाली राज शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारी भारताची पहिली आणि जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात मिथालीने ३५ वी धाव पूर्ण करताच हा पराक्रम आपल्या नावे केला. मिथालीच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००१ धावांची नोंद झाली आहे आणि सरासरी ४६.७३ आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन करताना म्हटले की, “किती महान क्रिकेटपटू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज. अभिनंदन मिथाली.” या ३८ वर्षीय भारतीय महिला फलंदाजापूर्वी इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्सने अशी कामगिरी केली होती. तिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ३०९ सामन्यांत १०,२७३ धावा केल्या आहेत.

आपला ३११ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या मिथालीने भारताकडून जून १९९९ मध्ये एकदिवसीय सामन्यामधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत १० कसोटी सामन्यांमध्ये ५१.०० च्या सरासरीने ६६३ धावा, एकदिवसीय मालिकेत २१२ सामन्यात ५०.५३ च्या सरासरीने ६,९७४ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ८९ सामन्यांमधून ३७.५२ च्या सरासरीने २,३६४ धावा केल्या आहेत. मिथालीने तिच्या कारकीर्दीत विक्रमी ७५ अर्धशतके आणि आठ शतके केली आहेत. यापैकी तिने एकदिवसीय सामन्यात ५४ अर्धशतके आणि सात शतके ठोकली आहेत. कसोटीत तिने एकमेव शतक (२१४ धावा) इंग्लंड विरुद्ध २००२ मध्ये टॉटन येथे केले आहे.

Leave a comment

0.0/5