केएल राहुलच्या ‘फ्लॉप शो’ नंतर टीम मॅनेजमेंटवर चाहते नाराज, म्हणाले- ‘आता तरी सूर्यकुमारला संधी द्या’

महाराष्ट्र बुलेटिन : भारतीय सलामीवीर केएल राहुलने इंग्लंड विरुद्ध होत असलेल्या टी-२० मालिकेत खराब कामगिरी सुरूच ठेवली. मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसर्‍या टी-२० मध्येही त्याची बॅट शांतच राहिली आणि तो पुन्हा शून्यावर बाद झाला. या मालिकेत दुसऱ्यांदा खाते न उघडता तो बाहेर पडला. शेवटच्या चार डावात राहुल तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. या सामन्यात त्याने सूर्यकुमार यादवच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या रोहित शर्मासह डावाची सुरूवात केली आणि चार चेंडू खेळल्यानंतरही तो खाते उघडण्यास अपयशी ठरला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने त्याला क्लीन बोल्ड केले. या मालिकेत तो दोनदा क्लीन बोल्ड झाला आहे. यावरून समजते की तो सध्या फॉर्ममध्ये नाही.

राहुल पुन्हा एकदा शून्यावर आऊट झाल्याने ट्विटरवर लोकांनी त्याला संघात ठेवण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरवात केली. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे की टीम इंडियाने आता केएल राहुलला मालिकेच्या उर्वरित सामन्यांसाठी विश्रांती दिली पाहिजे कारण तो सध्या फॉर्मात नाही. राहुलच्या ऐवजी सूर्यकुमारला संधी मिळायला हवी जेणेकरून तो देखील आपले कौशल्य दाखवू शकेल आणि संघाच्या विजयात काहीतरी योगदान देऊ शकेल. दुसर्‍या वापरकर्त्याने राहुल शून्यावर बाद झाल्यामुळे चिमटा काढला आणि लिहिले की केएल राहुल एकमेव असा सलामीवीर आहे, ज्याचे फलंदाजीमध्ये सातत्य दिसून येत आहे आणि तो सतत शून्यावर आऊट होत आहे.

तिसर्‍या टी-२० मध्ये टॉस हरल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. भारताच्या पहिल्या तीन विकेट्स २४ धावांवर कोसळल्या. रोहित शर्मा (१५), केएल राहुल (०) आणि ईशान किशन (४) धावा काढून बाद झाले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. पण जेव्हा संघाची धावसंख्या ६४ होती तेव्हा पंतही रनआऊट झाला. २० चेंडूत २५ धावा काढून तो बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यरही लवकर बाद झाला. भारताने केवळ ८६ धावांत ५ गडी गमावले होते. पण त्यानंतर कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यात सहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूत ७० धावांची भागीदारी झाली. परिणामी, भारताने २० षटकांत ६ गडी गमावून १५६ धावा केल्या. कर्णधार कोहली ७७ धावांवर नाबाद राहिला. दरम्यान इंग्लंडने विजयासाठी मिळालेले लक्ष्य जोस बटलर (८३) आणि जॉनी बेअरस्टो (४०) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर दोन गडी गमावून साध्य केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here