पुणे – मराठी माध्यमाच्या शाळा आता शाळेतील मुलांनी मिळवलेले विविध विषयातील प्राविण्य तसेच शाळास्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरट करण्यास सुरवात केली आहे. व्हाट्सअँप ग्रुप्स व फेसबुक पेजच्या माध्यमातून मुलांचे पालक, शिक्षक व शाळेचे माजी विद्यार्थी जोडण्यात येत आहेत. ई-लर्निंगच्या माध्यमातून नवनवे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ई-लर्निंगला प्राधान्य देण्यात येते. त्याप्रमाणे पालकांच्या, माजी विद्यार्थ्यांच्या आणि शाळा प्रशासनाच्या प्रयत्नातून मराठी शाळांचा ‘डिजिटायझेशन’कडे कल वाढू लागला आहे. विशेष म्हणजे येथे सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत आहे. शाळांत साजरे होणारे सण-उत्सव सोशल मीडियावरून ‘शेअर’ केले जात आहेत.
डिजिटल ग्रंथालये, फिरती प्रयोगशाळा, शाळांची स्वतंत्र संकेतस्थळे, यावरून पाठ्यपुस्तिका तसेच इतर माहितीचा खजिनाही विद्यार्थ्यांसाठी खुला झाला आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक आणि कौशल्यविकास घडावा, या उद्देशाने शाळास्तरांवरून वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ तयार करून घेण्यात आले आहेत.