Skip to content Skip to footer

मराठा क्रांती ठोक मोर्चा :दगडफेक करणाऱ्या अडीच हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल

सातारा : साताऱ्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनानंतर पुणे बेंगलोर महामार्ग रोखून जाळपोळ, तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अडीच हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दंगल घडवणे, खूनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानीची कलमे लावली आहेत. यामध्ये आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. गुरूवार पर्यंत एकुण 85 जणावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील 15 अल्पवयीन आहेत तर 58 जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली तर 12 जण अद्याप फरार आहेत.
बुधवारी सकल मराठा समाजाचा हजारो बांधवांच्या उपस्थितीत मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन शांततेत पार पडले. दुपारी बारानंतर मात्र, अचानक महामार्ग रोखण्यावरुन हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाचे हे लोण एवढे तिव्रतेने आक्रमक बनले की विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील सर्व भाग, नटराज मंदिर परिसरात आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत सातारा जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांसह तब्बल 32 कर्मचारी जखमी आहेत. दुपारी तीन नंतर अखेर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या जमावाला काबूत आणण्यास सुरुवात करुन धरपकड मोहीम राबविली होती.
दरम्यान, बुधवारी रात्रीपासून दंगलीत समावेश असणाऱ्यांची नावे समोर येत असून त्यामध्ये सातारा शहर व परिसरातील आंदोलकांचा समावेश आहे. गुन्ह्यात निष्पन्न झालेल्यांची नावे आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. फरार संशयितांचा शोध सुरु आहे. आंदोलकांच्या विरोधात पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी सुमारे 85 जणांना ताब्यात घेतले होते. संबंधितांची चौकशी करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनवाण्यात आली आहे.याशिवाय पोलिसांनी केलेले, शुटींग फोटो याची खातरजमा केली असता त्यातून आणखी अनेकांची नावे समोर आली आहेत. यामध्ये सुमारे अडीच हजार जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आंदोलकांच्या विरोधात दंगल घडवणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, खुनी हल्ला करणे, कट रचने यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a comment

0.0/5