Skip to content Skip to footer

यवतमाळमधील नरभक्षक वाघीण ठार – वनविभागाची कारवाई

यवतमाळमध्ये पांढरकवडा T-1 किंवा अवनी या नावाने ओळखण्यात येत असलेल्या नरभक्षक वाघिणाला ठार मारण्यात वनविभागाला यश आलं आहे. या वाघिणीने 14 लोकांना मारलं होतं, असं वनविभाग म्हणतं. या वाघिणीला मारल्यानंतर या भागातील ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. या वाघिणीला मारण्यासाठी वनविभागाला बरेच प्रयत्न करावे लागले होते. वाघिणीला मारण्यासाठी वनविभागाने महागडे परफ्युम, ड्रोन, हत्ती, शिकाऊ कुत्री, शार्ट शूटर तैनात केले होते. 

गेली दोन वर्षं या वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न फसल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी यवतमाळभोवतालच्या घनदाट जंगलात एक खास सुवासिक सापळा रचला आहे – पुरुषांचं एक महागडं परफ्यूम वापरून!

कॅल्विन क्लेन या लक्झरी ब्रँडचं पुरुषांसाठीचं परफ्यूम पांढरकवडा गावाच्या आसपासच्या जंगलात फवारण्यात आलं आहे. पण का?

“आम्ही असं ऐकलंय की अशा परफ्यूमच्या सुगंधाकडे वाघीण आकृष्ट होतात. म्हणून आम्ही झाडं आणि जमिनीवर हे परफ्यूम फवारण्याचा प्रयोग करत आहोत,” असं वनाधिकारी सुनील लिमये यांनी सांगितलं.

मांजर प्रजातीतील सिव्हेट या सस्तन प्राण्याच्या गंधग्रंथीपासून मिळवलेल्या सिव्हेटोन या पदार्थापासून हे परफ्यूम बनवण्यात येतात. न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणी संग्रहालयात केलेल्या एका प्रयोगादरम्यान जॅग्वार प्रजातीच्या वाघांना हे परफ्यूम आवडल्याचं दिसून आलं.

जीवशास्त्र अभ्यासक मिग्वेल यांनी ऑर्डेनान साइंटिफिक अमेरिकन मासिकाशी बोलताना सांगितलं की त्यांना विश्वास होता की जॅग्वार झाडाच्या फांद्यांवर फवारलेल्या परफ्यूमने आकर्षित होऊन कॅमेरा ट्रॅप मध्ये अडकतील. तीन वर्षांपूर्वी कर्नाटकच्या जंगलात कॅमेरा ट्रॅप आणि पिंजऱ्यांवर असंच परफ्यूम फवारून बिबट्यांना पकडण्यात आलं होतं.

पण या T-1 वाघिणीला पकडण्याची शोध मोहीम दोन वर्षं चालावी, त्यात यश न आल्यावर महागड्या परफ्यूमची मदत घ्यावी लागणं, ही बाब खूप निराशाजनक आहे.

आपल्या नऊ महिन्यांच्या दोन बछडयांसह लपूनछपून फिरणाऱ्या या वाघिणीच्या दहशतीखाली 150 वर्गकिलोमीटर क्षेत्रातील जंगलं, शेताडी आणि जवळजवळ २० गावं आहेत. या परिसरातील साधारण 5,000 लोक राहतात.

तिचा शोध घेणारे वनाधिकारी आणि शूटरही आता वैतागले आहेत.

पण मारणं हाच पर्याय का?

ऑगस्ट महिन्यात या वाघिणीने तीन लोकांना ठार केलं होतं. अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठी शेतकरी आणि गुराख्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत – जंगलातून, शेतातून लवकर घरी परत या, एकटे-दुकटे फिरू नका आणि उघड्यावर शौचासाठी जाऊ नका.

दुसरीकडे शहरातील प्राणीहक्क गटांनी मात्र सोशल मीडिया आणि इंटरनेटवर “Save the Tigress” अशी बचाव मोहीम हाती घेतली आहे. हे वनाधिकारी या वाघिणीला जिवंत पकडू शकत नाही, त्यामुळे तिचा बळी जाईल, अशी भीती त्यांना आहे.

मात्र सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च्य न्यायालयाने या प्रकरणी निर्णय दिला की या शोधमोहिमेदरम्यान नाईलाज झाला तरच वाघिणीला ठार केलं जावं. त्यात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही. पण तिला जिवंत पकडण्याचाच प्रयत्न व्हावा, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

वरिष्ठ वन्यजीव अधिकारी ए. के. मिश्रा म्हणतात, “आमचा उद्देश वाघिणीला मारण्याचा नाही, पण ते परिस्थितीवरही अवलंबून असेल. जर वाघिणीने आमच्यावर हल्ला केला तर तिला गोळी घालण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसेल. हा सगळा वेट अँड वॉचचा गेम आहे.”

वनाधिकारी म्हणतात हा “गेम” बराच काळ सुरूच आहे, आणि वाघिणीचा शोध घेण्याचे शक्य ते सर्व उपाय करून झाले आहेत.

दररोज 36 वनरक्षक जंगलात जाऊन जागोजागी ठेवलेले 100 कॅमेरा ट्रॅप शोधून तपासतात. आतापर्यंत T-1 आणि तिच्या बछड्यांची मिळून 300 छायाचित्रं मिळवण्यात यश आलं आहे.

जंगलात काही डझनभर ठिकाणी घोडे, मेंढ्यांना वाघिणीला खाण्याचे आमिष म्हणून झाडांना बांधून ठेवले आहेत. ऑक्टोबर महिन्यात त्यातले दोन घोडे ठार झाले, बहुदा ते वाघिणीनेच खाल्ले असावेत, पण ह्या सर्व शोधकार्यातून हाती मात्र काहीच लागलेले नाही.

टॉर्च, हत्ती आणि ड्रोन

वन अधीक्षक मोठे टॉर्च आणि वायरलेस सेटच्या आधारे जंगलात बांधलेल्या चार मचाणांवरून दिवसरात्र नजर ठेवून आहेत. शिवाय “व्याघ्र रक्षा दला”चे ५० कमांडो आणि AK47 बंदुका घेतलेले सशस्त्र पोलीस जंगलात गस्त घालत आहेत.

हे सर्वजण वाघाच्या ताज्या पाऊलखुणांचा शोध घेतात, वाघिणीचा मूत्र विसर्जनाच्या वासावरून तिचा माग काढतात, झाडांच्या खोडांवर वाघाने घासलेल्या नखांचे ठसे तपासतात. खास तैनात केलेले शार्प शूटरसुद्धा नऊ जणांच्या चमूसह पहारा देत असतात.

इतकेच नव्हे तर आकाशातून निरीक्षणासाठी एक ड्रोन आणि पॉवर ग्लाइडरचीही सोय करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त हत्तींची व्यवस्था करण्यात आली होती.

शिवाय जंगलाच्या सीमेवर सारती गावात एका तात्पुरत्या तंबूत तीन पिंजरे, नायलॉन जाळ्या सज्ज आहेत, जेणेकरून जंगलात वाघ सापडल्यास त्याला पकडून आणता यावं.

गुंगीच्या औषधांच्या बाणांसह पशुवैद्यांचा ताफा सज्ज करण्यात आला आहे. म्हणजे एकंदरीत या यंत्रणेत 500 माणसं गुंतलेली आहेत आणि तरीही T-1 वाघीण या सर्वांना हुलकावणी देत आहे.

या शोधमोहिमेच्या समन्वयक असलेल्या वरिष्ठ वनाधिकारी श्रीमती के. एम. अभर्णा T-1 वाघिणीबद्दल सांगतात, “ती खूप चलाख आहे. तिच्या बछड्यांबरोबर असल्याने ती जास्तच सावध असते. आम्हाला सहज चकवू शकते. शिवाय, या भूप्रदेशाची रचना आमच्या कामात मोठा अडथळा ठरत आहे.”

मुख्यत्वे सागवानाचं हे जंगल उंचसखल आणि खडकाळ आहे. इथे सर्वांत मोठी अडचण म्हणजे लंटाना जातीची जंगली झुडपं आहेत जी कधी कधी 8-10 फुटांपर्यंत उंच वाढतात. या झुडपांमुळे जंगलात वावरणं, वाघाचा ठिकाणा शोधण्यासाठी वाहनाने किंवा पायी फिरणं मुश्किल होतं. या जंगलात नीलगायी, रानडुकरं आणि खूप सारे साप आहेत. उन्हाळ्यात तर पारा 48 अंश सेल्सियसपर्यंत जातो तेव्हा लोकांची ताकद लवकर कमी करतात.”

शोधमोहिमेच्या सुरुवातीलाच एक दुःखद घटना घडली. गेल्या महिन्यात मोहिमेतील शूटर्स एका विशिष्ट ठिकाणी पाच हत्तींवरून जात होते. एका ठिकाणी थांबले असताना एक हत्तीण साखळदंड तोडून सैरावैरा पळू लागली, नासधूस करू लागली. तिच्या हल्ल्यात एका गावकरी महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे गावकऱ्यांचा रोष ओढवला आणि या हत्तींना परत पाठवण्यात आलं.

लिमये म्हणतात, “शोधमोहीम सुरूच आहे, आपण धीर धरायला हवा.”

या संदर्भात काही प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आहेत.

ही वाघीण आली कुठून, हे अद्याप कुणालाही माहीत नाही. एक गोष्ट नक्की की तिचा जन्म कुठल्याही व्याघ्र सुरक्षित परिसरात झाला नाही. तिची आई एका विजेच्या कुंपणाचा धक्का लागून मरण पावली होती, हे ही माहित आहे. अशा धोकादायक जनावरांपासून बचावासाठी शेतकरी अनेकदा आपल्या शेतांभोवती विजेच्या तारेचं कुंपण लावतात.

भारतात साधारण 2,200 वाघ राहतात, म्हणजे जगातील 60 टक्के. त्यापैकी 200 हून अधिक वाघ महाराष्ट्रात आहेत, पण यातील अवघे एक तृतीयांश वाघच राज्यातील 60 व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये आढळतात.

पण या T-1 वाघिणीला नरभक्षक म्हणायचं की नाही, याबद्दल अजूनही संभ्रम आहे.

2016 पासून या वाघिणीने 20 महिन्यात 10 लोकांना ठार केल्याचं मानलं जातं. ऑगस्ट महिन्यात जेव्हा तीन माणसं वाघाच्या हल्ल्यात ठार झाली, तेव्हा परिसरात घबराट पसरून हा मुद्दा ऐरणीवर आला.

बळी गेलेल्यांपैकी 13 व्यक्तींच्या जखमांतून सापडलेल्या वाघाच्या लाळेच्या जनुकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा 13 पैकी 7 नमुने मादी वाघाचे असल्याचं निष्पन्न झालं. अन्य दोनमधून काहीच निष्कर्ष निघाला नाही.

वाघिणीने आपलं भक्ष्य दूरवर फरफटत नेल्याने बहुतांश बळींची शरीरं छिन्नविछिन्न अवस्थेत आढळली. तिने मानवी मांस नक्कीच चाखलं असावं, कारण एका बळीचा पाय तुटलेला होता.

शिवाय, T-1 वाघिणीने माणसांवर का हल्ले केले होते, हेही समजत नाही.

एक म्हणजे वेगाने होणाऱ्या जंगलतोडीमुळे हे वाघ संरक्षित क्षेत्राभोवताली वसलेल्या मानवी वस्त्यांमधून शिरताना आढळतात. त्यातून मानव आणि वाघांमध्ये संघर्षाची परिस्थिती उद्भवते.

तसंच खूप जास्त संख्येने गुरं-ढोरं जंगलात चरायला नेणं, हेही T-1 वाघिणीच्या माणसांवरच्या हल्ल्यांचं आणखी एक कारण सांगितलं जात आहे.

परिसरातील खेड्यांमध्ये अंदाजे 30,000 गुरंढोरं आहेत. त्यापैकी बहुतांश वयस्क आणि अनुत्पादक स्वरूपाची आहेत. आता सरकारने गोहत्येवर कायद्याने निर्बंध घातल्याने त्यांचे मालक या गुरांना मारू शकत नाहीत. आणि घरात पुरेसा चारा नसल्याने नाईलाजाने गावकऱ्यांना या गुरांना चरण्यासाठी जंगलात घेऊन जावं लागतं. तिथेच अनेकदा वाघ मानवी हल्ले करतात, कारण हा मानव त्या वाघांच्या भक्ष्याच्या, म्हणजेच गुरांच्या आड येतो.

रक्त पिपासू वाघ

जानेवारी महिन्यात 70 वर्षांचे रामजी शेंद्रे आणि त्यांची पत्नी त्यांच्या दोन गुरांना घेऊन जंगलात शिरले. कीटक आणि डासांना घालवण्यासाठी त्यांनी जमा केलेल्या काटक्यांची शेकोटी पेटवली आणि अचानक मागून एक वाघ आला. साधारण पन्नास मीटरच्या अंतरावर त्यांची पत्नी लता उभी होती. तिने आपल्या नवऱ्याला वाघ ओढून नेतानाचं भयंकर दृश्य पाहिलं आणि मदतीसाठी आरडाओरड केली.

गावकरयांनी हल्ल्याच्या ठिकाणी धाव घेतली. जवळच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवून जोरात हॉर्न वाजवले. तोपर्यंत वाघाने शेंद्रे यांना दोन किलोमीटरपर्यंत खेचत नेऊन तिथेच टाकून दिलं होतं.

लता शेंद्रे म्हणतात, “ती तिची शिकार खात नाही. ती फक्त मानवी भक्ष्याचं रक्त पिते.”

बरेचसे गावकरी तिला “रक्त पिपासू वाघीण” म्हणतात, पण अधिकारी सांगतात की बऱ्याचदा तिने आपल्या सावजांचं मांसही खाल्लं आहे.

तरीही अखेर, 21 मे रोजी T-1 वाघीण मोहिमेतील शिकाऱ्यांच्या हाती जवळजवळ सापडलीच होती. सारती गावाजवळच्या तंबू पासून 18 किलोमीटर अंतरावर, एका नीलगायीला खात असताना ही T-1 वाघीण शोधमोहीम गटाच्या दृष्टीस पडली.

अभर्णा सांगतात, “त्या सर्वांनी तिला घेराव घातला आणि गुंगीच्या औषधाचा तो बाण तिला मारला.”

तिला तो बाण अचूक बसला होता. पण ती वळली आणि अरुंद डोहातून पोहत, समोरची शेताडी ओलांडत, खडीचा उंच सखल रस्ता पार करून नाहीशी झाली.

अधिकाऱ्यांच्या मते “एक तर त्या क्षणी ती खूप उत्तेजित झाली असावी, ज्यामुळे गुंगी औषध निष्प्रभ ठरलं असेल किंवा त्या औषधाचं प्रमाणच पुरेसं नव्हतं.”

जेव्हा वनअधिकारी आपली 4X4 गाडी गेऊन तिच्या मागावर निघाले, तेव्हा T-1 वाघीण रस्त्यावर उभी होती. तिने त्यांच्या गाडीकडे आपला मोर्चा वळवला.

अभर्णा त्या क्षणाचा थरार सांगतात, ” ती आमच्या गाडीकडेच येत होती… मोठ्याने डरकाळी फोडत होती. ती खूप खूप रागात होती.”

नंतर ती जंगली झुडुपांमध्ये दिसेनाशी झाली.

Leave a comment

0.0/5