आंदोलनामुळे करंजेपुल जाम
सोमेश्वरनगर- मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी करंजेपूल (ता. बारामती) येथे लहुजी सेनेच्या वतीने नीरा-बारामती रस्त्यावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बीडमधील युवकास जलसमाधी घ्यावी लागल्याबद्दल सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलनामुळे दुपारपर्यंत करंजेपूल बंद होता.
मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी बीडमधील संजय ताकतोडे या युवकाने पाली धरणात जलसमाधी घेतली. याच्या निषेधात शनिवारी (दि. 9) सकाळी करंजेपूल येथे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मांतग समाजाला अनुसूचित जातीमधील 13 टक्के आरक्षणातून अ, ब, क, ड नुसार स्वतंत्र आरक्षण मिळावे, संजय ताकतोडे यांच्या कुटूंबास 25 लाख तात्काळ मदत मिळावी, कुटूंबातील एकास सरकारी सेवेत घ्यावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशा मागण्यांचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.
याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटोळे, जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू भिसे, तालुका युवक अध्यक्ष दादा सकट, सरचिटणीस राजेंद्र भिसे, कार्यध्यक्ष सचिन जाधव, विकास शेंडगे, अनिल भिसे, शेखर पाटोळे, धनाजी पाटोळे, सुनील पाटोळे आदी उपस्थित होते.